ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : दहीहंडीचा जल्लोष, थरांचा थरार, ‘गोविंदा रे गोपाळा’चा गजर आणि मान्यवरांची मांदियाळी ठाणे शहर सध्या उत्सवाच्या रंगात न्हाऊन निघाले आहे. मात्र, या आनंदोत्सवात कोणताही गोविंदा जखमी होऊ नये, कोणाचाही जीव धोक्यात येऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणेने सर्वतोपरी तयारी केली आहे.
यंदा ठाणे सिव्हील रुग्णालयात जखमी गोविंदांसाठी 20 बेडचा विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षात सर्व आवश्यक सुविधा, औषधे आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. कोणताही गोविंदा अपघातग्रस्त झाल्यास तातडीने उपचार मिळावेत, हा यामागचा मुख्य हेतू आहे.
दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदा पथकांनी उंच थर रचण्याची तयारी केली आहे. थर चढताना एकमेकांना हात देणारे, खांद्यावर उचलून घेणारे आणि पडल्यास पकडून सावरणारे हात हीच खरी गोविंदा परंपरेची ओळख आहे. मात्र एखाद्या घटनेत गोविंदा पडून जखमी होण्याची शक्यता असते. अशावेळी सिव्हील रुग्णालयाची विशेष कक्ष मदतगार ठरू शकतो.
दहीहंडी हा केवळ शक्ती, कौशल्य आणि मैत्रीचा सण नाही, तर काळजी, जिव्हाळा आणि सुरक्षिततेची भावना जपण्याचं प्रतीक आहे. या उत्सवात प्रत्येक गोविंदाची सुरक्षा तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे दही हंडीचे मनोरा लावताना कोणी गोविंदा जखमी झालाच तर त्याच्यासाठी सिव्हिल रुग्णालय विशेष कक्ष तैनात आहे.