स्वातंत्र्यदिनासोबत स्वच्छताही महत्वाची ! ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ अभियानाला सुरुवात
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात “हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता” या विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. ‘स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग’ या टॅगलाइनखाली राबविण्यात येणारा हा उपक्रम सांस्कृतिक मंत्रालय, पेयजल व स्वच्छता विभाग आणि राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि प्रकल्प संचालक पंडित राठोड यांनी नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मोहिमेचा उद्देश केवळ स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करणे नसून, स्वच्छतेबद्दल जनजागृती निर्माण करून प्रत्येक घर, परिसर आणि गाव स्वच्छ ठेवणे हा आहे.
या मोहिमेत सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, जलकुंभ व पाणीपुरवठा सुविधा सुशोभीकरण, स्वच्छता घटकांचे देखभाल व सजावट यावर विशेष भर दिला जाणार आहे. गावागावात विद्यार्थी आणि युवक स्वच्छता रॅली काढतील, तसेच घराघरात रांगोळ्या, सजावट करून स्वच्छतेचा संदेश दिला जाईल.
या चार दिवसांच्या मोहिमेत विविध महत्त्वाचे उपक्रम हाती घेण्यात येतील. त्यामध्ये —
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, स्वच्छतेचा संदेश फक्त सरकारी यंत्रणेमधून नव्हे तर प्रत्येक नागरिकाच्या सक्रिय सहभागातून पसरवला जावा. विद्यार्थ्यांनी रॅली, घोषवाक्ये, पोस्टर प्रदर्शन यामार्फत स्वच्छतेचा प्रचार करावा, तसेच महिलांनी आणि ग्रामस्थांनी घरासमोर व सार्वजनिक ठिकाणी सजावट, रांगोळी व झेंडे लावून देशभक्तीची आणि स्वच्छतेची जाणीव वाढवावी.
मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, “स्वातंत्र्याचा उत्सव आणि स्वच्छतेची चळवळ यांचा संगम साधण्यासाठी ही मोहिम राबवली जात आहे. यामुळे गावागावात स्वच्छतेची नवी ऊर्जा निर्माण होईल.”