शाळेतून वडिलांसोबत घरी निघाला अन् काळाचा घाला! सिमेंट मिक्सरच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सौरभ विश्वकर्मा हा शाळा सुटल्यानंतर आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून घरी जात होता. दहिसर टोल नाक्याजवळील गोदावरी लॉजसमोर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या सिमेंट मिक्सर ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार दोघेही रस्त्यावर पडले. यावेळी सौरभचे डोके ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा गंभीर अपघात झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच काशिमीरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात घेत पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू केली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या सिमेंट मिक्सर ट्रकच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, आरसीसी प्लांटसाठी वापरल्या जाणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीचा आणि त्यांच्या चालकांकडून वाहतूक नियमांचे पालन होत आहे का, याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अवजड वाहनांकडून वेगमर्यादा, सुरक्षित अंतर आणि वाहतूक नियमांचे पालन न झाल्यास अशा दुर्घटनांमध्ये निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागतो, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे.
या अपघातामुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अवघ्या १४ वर्षांच्या सौरभचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास काशिमीरा पोलीस करत असून, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, ट्रकचा वेग किती होता आणि चालकाकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाले होते का, याबाबत तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.






