मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील आरोपींना हायकोर्टाचा दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला
ठाणे: बदलापूर येथील शाळेत लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराची दुर्दैवी घटना घडली होती. बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. दरम्यान या प्रकरणात शाळेचे संस्थाचालक, सचिव आणि फरार आरोपी यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. या प्रकरणातील फरार आरोपींना हायकोर्टाने दिलासा देण्यास नकार दिल आहे. तर यातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे यांचा एनकाऊंटर करण्यात आला आहे. तसेच त्याचे शव देखील दफन करण्यात आले आहे.
बदलापूर येथे एक शाळेत लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी शाळेचे संस्थाचालक आणि सचिव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात या फरार आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. दरम्यान यावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असताना घटना दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
बदलापूर येथील शाळेचे संस्थाचालक आणि सचिव यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात याचिका केली होती. हे प्रकरण जामीन देण्यास योग्य नाही आहे. घटना अतिशय संवेदनशील आहे. तसेच पोलिसांना तपासात सहकार्य करण्याऐवजी आरोपी बनवताच हे आरोपी फरार झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणात जामीन देता येणार नाही असे म्हणत हायकोर्टाने आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. सत्र न्यायालयाने देखील जामीन अर्ज फेटाळत असताना हाच मुद्दा मांडला होता. त्याच मुद्द्यावर हायकोर्टाने देखील अटकपूर्व जामीन नाकारला आहे.
मुख्य आरोपीचा एनकाऊंटर
बदलापूर येथे शाळकरी मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. याचदरम्यान बदलापूर अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे यानं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. पोलीस त्याला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना त्यानं पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर पोलिसांनी स्ववसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. दरम्यान आता उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेचे शव दफन करण्यात आले आहे.