Airoli-Katai Highway: नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली प्रवास होणार जलद; दुहेरी बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात

Airoli-Katai Highway: नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीदरम्यानचा प्रवास आता अधिक जलद होण्याची शक्यता आहे. ऐरोली-काटई महामार्गाच्या पहिल्या दोन टप्प्यांची कामे अंतिम टप्प्यात आली असून, हा मार्ग सुरू झाल्यानंतर वाहनचालकांचा ३० ते ४५ मिनिटांचा वेळ वाचण्याची अपेक्षा आहे. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी प्रकल्पाची पाहणी केली.
नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली प्रवास होणार जलद
नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली प्रवास होणार जलद
Published on: 
Updated on: 
  • ऐरोली-काटई महामार्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांची कामे अंतिम टप्प्यात आले आहे.

  • या प्रकल्पामुळे नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवलीदरम्यानचा प्रवास अधिक जलद होणार आहे

  • हा मार्ग ऐरोलीला मुंब्रा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ शी जोडणार आहे

नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली परिसरादरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ऐरोली-काटई नाका महामार्ग प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांची कामे अंतिम टप्यात आली आहेत. या मार्गामुळे वाहनचालकांचा दररोजचा प्रवासाचा वेळ सुमारे ३० ते ४५ मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा असून, प्रवासाचे अंतरही ७ ते ८ किलोमीटरने कमी होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी या संपूर्ण मार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूर्ण झालेल्या रस्ते पायाभूत सुविधांची, सुरू असलेल्या अंतिम टप्प्यातील कामांची तसेच बोगद्याच्या प्रवेश आणि निर्गमन मार्गावरील सुरक्षा उपाययोजनांच्या प्रगतीची माहिती घेतली.

संरक्षणात्मक उपाययोजनांवर भर

या प्रकल्पात रस्त्यांची कामे पूर्ण करण्याबरोबरच डोंगर उताराचे स्थिरीकरण आणि बोगद्याच्या परिसरातील संरक्षणात्मक उपाययोजनावर विशेष भर दिला जात आहे. पावसाळ्यात संभाव्य दरड कोसळणे किवा माती घसरण्याचे धोके कमी करून वर्षभर सुरक्षित वाहतूक सुरू राहावी, यासाठी ही कामे करण्यात येत आहेत. उर्वरित कामे दर्जा आणि सुरक्षिततेचे सर्वोच्च निकाय पाळून वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश महानगर आयुक्तांनी संबंधित यंत्रणांना दिले.

दोन्ही टप्पे एकाच वेळी खुले करणार

ऐरोली-काटई नाका मार्गाच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये १.६९ किलोमीटर लांबीचा दुहेरी बोगदा आणि उन्नत रस्त्यांचा समावेश आहे. हे दोन्ही टप्पे एकाच वेळी वाहतुकीसाठी खुले करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. या मार्गामुळे ऐरोली ते मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ (एनएच-४) दरम्यान थेट संपर्क उपलब्ध होणार आहे.

३० ते ४५ मिनिटांची आता होणार बचत !

सध्या ऐरोली शहर, ठाणे-बेलापूर मार्ग, गहाणे, शिळफाटा आणि कल्याण फाटा या मार्गाने करावा लागणारा प्रवास टाळण्यासाठी हा पर्यायी मार्ग उपयुक्त ठरणार आहे. पुढील तिसऱ्या टप्प्यात हा मार्ग काटई नाववापर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील वाहतूक संपर्क अधिक मजबूत होऊन प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची बवत होण्यास मदत होणार आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)