मीरा भाईंदर/विजय काते : शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेला घोडबंदर किल्ला पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी कारण आहे – या किल्ल्यावर उभारण्यात आलेला भव्य भगवा ध्वज सध्या पूर्णपणे जीर्ण आणि फाटलेली अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. केवळ एका वर्षात हा ध्वज झिजल्यामुळे स्थानिक नागरिकांत तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांत संतापाची भावना उसळली आहे.
राज्यभरातील सर्वात मोठ्या भगवा ध्वजांपैकी एक
गेल्या वर्षी परिवहन मंत्री आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने घोडबंदर किल्ल्यावर उभारण्यात आलेला भगवा ध्वज राज्यभरातील सर्वात मोठ्या ध्वजांपैकी एक होता. हा ध्वज केवळ एक प्रतीक नव्हता, तर मराठी अस्मिता, सांस्कृतिक गौरव आणि इतिहासाचे प्रतिक म्हणून त्याकडे पाहिले जात होते. मात्र सध्या तो ध्वज जीर्ण झाल्याने त्याचे अस्तित्वच अपमानित झाल्यासारखे वाटत असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.
मनसेचा आक्रमक पवित्रा; महापालिकेला 48 तासांचा अल्टिमेटम
या परिस्थितीवर लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मीरा-भाईंदर शहर शाखेने मनपा प्रशासनाला आधीच पत्राद्वारे 48 तासांची मुदत देऊन नव्या ध्वजाची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. परंतु मनपाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या मनसेने आज महापालिकेच्या कार्यालयावर धडक दिली.
शहरप्रमुख संदीप राणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनपा अधिकाऱ्यांना स्वतःच्या खर्चाने आणलेला नवा भगवा ध्वज सुपूर्त केला. यासोबतच, 24तासांच्या आत हा ध्वज घोडबंदर किल्ल्यावर फडकवला गेला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
उत्तरदायी अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा
मनसेने यावेळी स्पष्टपणे सांगितले की, जर वेळेत कृती झाली नाही, तर मनपा प्रशासनातील उत्तरदायी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेविरोधात काळे फासण्याचा निर्णय घेतला जाईल. हे आंदोलन केवळ एका ध्वजापुरते मर्यादित नाही, तर मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी आवश्यक असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
“शांत बसणार नाही” ; संदीप राणे यांची प्रतिक्रिया
माध्यमांशी बोलताना संदीप राणे म्हणाले,”घोडबंदर किल्ला हा आमच्या शहराचा ऐतिहासिक अभिमान आहे. भगवा ध्वज ही आमच्या संस्कृतीची शान आहे. मनपा प्रशासन जर इतकं बेफिकीर असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. आम्ही आपल्या प्रयत्नांनी हा ध्वज पुन्हा लावणारच, आणि यामध्ये अडथळा आणणाऱ्यांना जनता विसरणार नाही.”
स्थानिक जनतेतून पाठिंबा
या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचाही भरघोस पाठिंबा लाभत आहे. अनेकांनी सोशल मीडियावरून मनसेच्या कृतीचे समर्थन करत मनपावर टीका केली आहे. “इतिहास आणि संस्कृती जपली पाहिजे, हे काम सरकारपेक्षा जनतेनेच जास्त गांभीर्याने घेतले पाहिजे,” अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.