
प्रशासनाचा मतदानाबाबत महत्त्वाचा निर्णय (फोटो सौजन्य - iStock)
ठाणे महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजले असून जागावाटपाच्या जोरबैठका राजकीय पक्षांकडून सुरू आहेत. याच दरम्यान लोकशाहीचा हा उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय लगबगही शिगेला पोहचली आहे. निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार ही तयारी सुरू आहे. त्याअंतर्गत मतदान केंद्र उभारण्यात येत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्र बनवण्यात आले होते. त्यासाठी सोसाट्यांच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली होती. सोसायटीमध्येच मतदानाची सोय उपलब्ध झाल्याने त्याचा तेथील रहिवाशांना दिलासा मिळाला होता. पण, आता अशाप्रकारच्या रहिवासी सोसायट्याना आणि इमारतींना यावेळी वगळण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
प्रशासन सतर्क
१३१ नगरसेवक पदांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष अशा उमेदरांची संख्या पाच ते दहा पट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे उमेदवार किंवा त्यांचे नातेवाईक, कार्यकर्ते राहत असलेल्या गृहसंकुले, इमारतींमध्ये मतदान केंद्र उभारल्यास त्यांच्या प्रभावाखाली मतदान होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे अशा इमारती, रहिवासी सोसायट्यांची छाननी करणेही शक्य नाही. त्यामुळे सरसकट सर्वच सोसायट्यांना मतदान केंद्रांच्या यादीतून वगळण्यात आले असून शाळा, महाविद्यालय, शासकीय इमारतीमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात येत असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
मतदान केंद्रांची संख्या २१०० पर्यंत जाण्याची शक्यता
हरकती सूचनांनंतर प्रशासनाने मतदारांची अंतीम यादी जाहिर केली असून त्यानुसार सुमारे १६ लाख ४९ हजारांच्या पुढे मतदार आहेत. प्रभागनिहाय मतदारांच्या संख्येनुसार मतदार केंद्र निश्चित केले जात आहे. सुमारे ८०० ते ९०० मतदारांसाठी एक केंद्र असे प्रशासनाचे नियोजन आहे.
Local Body Elections: मनपा निवडणुकीआधी सांगली पोलिस अॅक्शन मोडमध्ये; १५०० गुन्हेगारांना थेट…