राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसानं झोडपलं
दहिवडी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : माण तालुक्यात सलग चार दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली असून, माण तालुक्याच्या पश्चिमेच्या भागात पावसाने जोर धरला आहे. शुक्रवारी पूर्ण दिवसभर दहिवडी, बिदाल, मलवडी, शिरवली, परकंदी, महिमानगड, पिंगळी, आंधळी, बिजवडी, कासारवाडी या गावांसह सर्वच भागात पावसाची संततधार सुरू होती. या पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे-नाले ओसंडून वाहत होते.
दहिवडी कुळकजाई हा रस्ता सिंदीखुर्द येथील ओढ्यावर पाणी असल्याने दिवसभर वाहतुकीसाठी बंद पडला होता. या रस्त्यावरील नवीन पुलाचे काम सुरू असून, तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी पूल केला होता. मातीचा भरावा असलेला पर्यायी पूल खचल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. गेल्या चार दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्या पावसामुळे जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
तसेच टोमॅटो, आंबासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही पाहायला मिळत आहे. भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मध्यंतरी वादळी वारा सुटल्याने कडवळसारखी चारा पिके भुईसपाट झाली आहेत.
अजूनही २८ गावांसह २१८ वाड्या वस्त्यांना टँकर सुरु
माण तालुक्यातील २८ गावांसह २१८ वाड्या वस्त्यांना शासकीय ३ खासगी ३१ टँकरच्या ५९ खेपाव्दारे पाणीपुरवठा सुरु आहे. टँकर सुरु असलेल्या गावाचे नावे पुढीलप्रमाणे बिजवडी, मोही, डंगिरेवाडी, थदाळे, वावरहिरे, अनभुलेवाडी, दानवलेवाडी, हस्तनपुर, सोकासन, धुळदेव, वरकुटे म्हसवड, कारखेल, भाटकी, खडकी, रांजणी, हवालदारवाडी, जाशी, पळशी, पिंगळी बु.,मार्डी , खुटबाव, पर्यंती, इंजबाव, भालवडी, विरळी, वारुगड, उकिर्डे, दोरगेवाडी अशा एकूण २८ गावे आणि २१८ वाडयाचा समावेश आहे.
मान्सूनपूर्व पावसाचा बसतोय मोठा फटका
महाराष्ट्राच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. या मान्सूनपूर्व पावसाचा मोठा फटका हा राज्याला बसला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या पावसामुळे काही ठिकाणी दुर्घटना देखील घडल्या आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.