मुंबई : प्रो-कबड्डी लीग स्पर्धेचा अकरावा मोसम 18 ऑक्टोबर रोजी सुरू होत असून, तेलगु टायटन्स विरुद्ध बंगळुरू बुल्स यांच्यात हैद्राबाद येथे होणाऱ्या सलामीच्या लढतीने स्पर्धेला प्रारंभ होत असल्याचे लीगचे संयोजक मशाल स्पोर्ट्स यांनी आज जाहीर केले. तेलगु टायटन्सचा स्टार चढाईपटू पवन सेहरावत आणि बंगळुरू बुल्सचा परदीप नरवाल यांच्यातील झुंज या लढतीचे खास आकर्षण ठरणार आहे.
इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू यु मुंबा संघाचा सुनील कुमार
त्याचदिवशी होणाऱ्या दुसऱ्या लढतीत लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू यु मुंबा संघाचा सुनील कुमार आणि दबंग दिल्ली के.सी. संघाचा नवीन कुमार यांच्यातील चुरस खास आकर्षण ठरणार आहे. यदांच्या मोसमात प्रो कबड्डी लीग पुन्हा एकदा तीन शहरांमध्ये खेळविली जाणार असून 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2024 दरम्यान हैद्राबाद येथील गच्ची बाऊली इंडोर स्टेडियम येथे पहिले सत्र पार पडणार आहे.
पुण्यातील बालेवाडी बॅडमिंटन स्टेडियम येथे रंगणार सामना
स्पर्धेचे दुसरे सत्र 10 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 दरम्यान नोएडा इंडोर स्टेडियम येथे होणार आहे. तर, तिसरे सत्र पुण्यातील बालेवाडी बॅडमिंटन स्टेडियम येथे 3 ते 24 डिसेंबर 2024 दरम्यान रंगणार आहे. स्पर्धेच्या प्ले ऑफच्या लढतीचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
लाखो कबड्डी प्रेमींचा स्पर्धेतील सहभाग
याविषयी बोलताना मशाल स्पोर्टसचे क्रिडा विभाग प्रमुख व प्रो कबड्डी लीगचे कमिशनर अनुपम गोस्वामी म्हणाले की, या प्रो कबड्डी लीगच्या प्रत्येक मोसमाचे वेळापत्रक हे लाखो कबड्डी प्रेमींचा स्पर्धेतील सहभाग त्यांच्या आवडत्या संघांवरील प्रेम आणि कमालीची स्पर्धात्मकता हे सर्व ध्यानात ठेऊन आखलेल्या यंदाच्या मोसमाच्या वेळा पत्रकातूनही आमच्या पाठीराख्यांची अपेक्षांची पूर्तता होईल आणि सर्व 12 संघांना डावपेच आखण्यासाठी योग्य संधी मिळेल, असा आमचा विश्वास आहे.
प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या मोसमासाठीचा लिलाव मुंबई येथे 15 व 16 ऑगस्ट 2024 रोजी पार पडला. आठ खेळाडूंनी 1 कोटींची मर्यादा ओलांडल्यामुळे हा लिलाव ऐतिहासिक ठरला.
कबड्डी लीग लोकप्रिय करण्यात मोलाचा वाटा
या स्पर्धेच्या साखळी फेरीचे संपूर्ण वेळा पत्रक आम्ही जाहीर करीत आहोत. मशाल स्पोर्ट्सबरोबरच डिस्ने स्टार यांनीही प्रो कबड्डी लीग लोकप्रिय करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. अखिल भारतीय कबड्डी महासंघा(एकेएफआय)च्या सहकार्याने मशाल स्पोर्टस यांनी आयोजित केलेल्या या लीगच्या अभूतपूर्व यशामुळे स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना जगभर प्रसिद्धी मिळाली आहे. तसेच, कबड्डी खेळणाऱ्या अनेक देशांनीही प्रो कबड्डी लीगच्या तारखांप्रमाणे आपल्या देशातील विविध कबड्डी स्पर्धांचे वेळापत्रके आखली आहेत.
प्रो कबड्डी लीगच्या सर्व माहितीसाठी www.prokabaddi.comया संकेस्थळाला भेट द्या अथवा इंस्टाग्राम, युट्युब, फेसबुक आणि एक्स यासाठी @prokabaddi या संकेस्थळाला भेट द्या. प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या मोसमाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टसच्या वाहिन्यांवर पाहता येणार आहे. तसेच डिस्ने प्लस हॉट स्टारवर त्याचे थेट स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे.
Web Title: The eleventh season of the pro kabaddi league begins with telugu titans vs bengaluru bulls at pune