
राज्यातील चालक-वाहकांची वाढणार कमाई; एसटी महामंडळाची 'ही' योजना ठरणार फायद्याची...
गोंदिया : एसटीने ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक उत्पन्न आणणाऱ्या वाहक व चालकाला प्रत्येक 10 टक्के प्रोत्साहन रक्कम दिली जाणार आहे. ही योजना 1 ते 31 जानेवारी या कालावधीत राज्यभरात प्रायोगिक तत्त्वावर चालवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक 26 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले आहे.
हेदेखील वाचा : पुण्यातल्या पदपथांचा श्वास कोंडला ! अतिक्रमणापुढे सगळेच हतबल; कारवाईचे फिक्स पॉइंट तयार करण्याचे मंत्र्यांचे निर्देश
खासगी वाहतुकीशी स्पर्धा करताना आपल्याकडे प्रवाशांना आकर्षित करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न एसटी प्रशासन करीत असते. त्यासाठी एसटीने आजपर्यंत अनेक प्रयोग केले आहेत. चालक व वाहकाला प्रोत्साहन भत्ता दिल्यास ते एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करतील, अशी आशा एसटी महामंडळाला आहे. त्यासाठी त्यांनी प्रोत्साहन भत्ता ही योजना सुरू केली.
कोणत्या मार्गावर किती उत्पन्न मिळते याची सरासरी काढली जाणार आहे. त्या उत्पन्नापेक्षा अधिकचे उत्पन्न आणल्यास त्या अधिकच्या उत्पन्नावर 20 टक्के प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. हा भत्ता चालक व वाहक यांनी प्रत्येकी 10 टक्के याप्रमाणे वाटून दिला जाणार आहे. त्यामुळे त्यांनाही वैयक्तिक लाभ मिळेल.
…तर चालक-वाहकांना भत्ता नाही
उपक्रम सध्या 1 ते 31 जानेवारी या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर संपूर्ण राज्यात राबवला जात आहे. याचे निकाल बघून हा उपक्रम पुढे सुरू ठेवायचा की नाही? याबाबतचा निर्णय एसटी महामंडळ घेणार आहे. नवीन उपक्रम असल्याने चालक व वाहक यांच्यामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. प्रवाशांशी गैरवर्तणूक करीत असल्याची तक्रार चालक व वाहकाविरोधात असल्यास त्यांना सदर भत्ता लागू राहणार नाही.
उत्पन्न वाढीसाठी एसटीचा नेहमी प्रयोग
प्रवाशांना चांगली सेवा देण्याबरोबरच उत्पन्न वाढीसाठी एसटी नेहमी प्रयोग करीत असते. त्याचाच हा एक भाग आहे. एसटीला अधिकचे उत्पन्न मिळवून देण्याबरोबरच चालक व वाहकांनाही अधिकचे उत्पन्न प्राप्त करण्याची संधी आहे. याचे सकारात्मक परिणाम नक्कीच दिसून येतील, अशी अपेक्षा आहे. दोन पैसे जास्त मिळणार असल्याने चालक व वाहक विशेष प्रयत्न करतील. परिणामी, एसटीचे उत्पन्न वाढेल, अशी अपेक्षा व्यवस्थापनाला आहे.
– येतीश कटरे, आगार व्यवस्थापक, गोंदिया