
The literary convention began grandly with the flag hoisting ceremony! The literary city resonated with the sounds of the police band.
प्रगती करंबेळकर/सातारा : ऐतिहासिक साताऱ्यात नववर्षाची पहाट साहित्याच्या तेजाने उजळली. स्वराज्यरक्षक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीत राज्य पोलिस बँडच्या निनादात ध्वजारोहण होताच ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कार्यक्रमांचा उत्साहात प्रारंभ झाला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९व्या साहित्य संमेलनाचा शुभारंभ गुरुवारी (दि. १) प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहणाने झाला. राष्ट्रगीत व राज्यगीताच्या सादरीकरणाने साहित्यनगरीतील वातावरण भारावून गेले. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत शाहू स्टेडियम येथे महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे शाखा शाहुपुरी, सातारा) आणि मावळा फाउंडेशन यांच्या वतीने हे संमेलन होत आहे. यावेळी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील, महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, कवी विठ्ठल वाघ, डॉ. राजा दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले. मुख्य सभामंडपाकडे जाणाऱ्या मार्गावर उभारलेली प्रकाशन संस्थांची दालने हे यंदाचे वैशिष्ट्य ठरले. बालवाचक कट्टा, गझलकट्टा यांचाही शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. संमेलनस्थळी साहित्यिकांच्या कार्याचा आढावा घेणारे माहितीफलक उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहेत.
कवीकट्ट्याच्या उद्घाटन प्रसंगी गाडगेबाबांच्या वेशभूषेत उपस्थित असलेल्या फुलचंद टिळक यांनी लक्ष वेधले. सोलापूर जिल्ह्यातील ६८ वर्षीय नागटिळक हे यापूर्वी साताऱ्यात झालेल्या संमेलनातही याच वेशभूषेत उपस्थित होते. त्यांची उपस्थिती लोकपरंपरा, समाजप्रबोधन आणि साहित्य यांचे भावनिक नाते अधोरेखित करणारी ठरली. बालवाचक कट्टयाचे उद्घाटन शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, विनोद कुलकर्णी आदी उपस्थित होते. दरम्यान, संमेलनस्थळी ठिकठिकाणी ग.दि. माडगुळकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, सदानंद रेगे आदी साहित्यिकांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारे फलक उपस्थितांच्या नजरेचा केंद्रबिंदू ठरत होती.
हेही वाचा : IND vs NZ ODI Series : न्यूझीलंडविरुद्ध मैदानात दिसेल ऋषभ पंत? भारतीय संघात ‘या’ खेळाडूंची जागा निश्चित
कवीकट्टा बहरला
कवीकट्ट्यासाठी महाराष्ट्रासह बृहन्महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला असून, १७६२ कवितांमधून ४५० कवितांची निवड कट्ट्यासाठी करण्यात आली आहे. त्यामध्ये बृहन्महाराष्ट्रातील १४० कविता आहेत. जपान आणि आबुधाबी येथूनही एकेक कविता आली आहे. २२ तास २२ सत्रांत कवीकट्टा सुरू राहणार आहे, असे आयोजकांनी सांगितले.