रोहित-विराट आणि आर आश्विन(फोटो-सोशल मीडिया)
Ravichandran Ashwin’s comments on ODI cricket : माजी भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने एकदिवसीय क्रिकेटबाबत मोठे भाष्य केले आहे. त्याच्यामते २०२७ च्या विश्वचषकानंतर दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा क्रिकेटमधून निवृत्त होतील तेव्हा एकदिवसीय क्रिकेटचे अस्तित्व आणि प्रासंगिकता धोक्यात येण्याची शक्यता आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट आणि रोहितच्या सहभागाबद्दल बरीच चर्चा रंगली होती. मात्र, माजी दिग्गज फिरकीपटूने असा विश्वास व्यक्त केला की, वाढत्या टी-२० लीग आणि कसोटी क्रिकेटचे वाढते महत्त्व यामुळे एकदिवसीय स्वरूपासाठी जागा हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : IND vs NZ ODI Series : न्यूझीलंडविरुद्ध मैदानात दिसेल ऋषभ पंत? भारतीय संघात ‘या’ खेळाडूंची जागा निश्चित
आर अश्विनने त्याच्या हिंदी युट्यूब चॅनल ‘ऐश की बात’ वर संवाद साधला आहे. “२०२७ च्या विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटचे भविष्य काय असेल हे मला माहित नाही. मात्र, मला त्याबद्दल थोडी काळजी वाटते. मी विजय हजारे ट्रॉफी पाहत आहे, परंतु मी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी पाहिल्याप्रमाणे ते पाहणे थोडे कठीण आहे.” अश्विन पुढे म्हणाला की, “प्रेक्षक काय पाहू इच्छितात हे देखील आपल्याला समजून घ्यायला हवे. मला वाटते की कसोटी क्रिकेटसाठी अजून देखील जागा आहे, परंतु एकदिवसीय क्रिकेटसाठी खरोखर जागा शिल्लक नाही.”
भारताचा माजी यशस्वी गोलंदाज अश्विनचा असा विश्वास आहे की विराट आणि रोहितच्या निवृत्तीनंतर एकदिवसीय स्वरूप आणखी कमकुवत होऊ शकते. दोन्ही खेळाडूंनी एकत्रितपणे ८६ एकदिवसीय शतके ठोकली आहेत. अश्विन म्हणाला की, “बघा, जेव्हा रोहित आणि विराट विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळायला मैदानात आले तेव्हा लोकांनी तती स्पर्धा पाहण्यास सुरुवात केली. आम्हाला माहित आहे की खेळ नेहमीच खेळाडूंपेक्षा मोठा असतो, परंतु कधीकधी या खेळाडूंचे (रोहित आणि विराट) पुनरागमन खेळ प्रासंगिक ठेवण्यासाठी देखील आवश्यक असते.”
अश्विन म्हणाला की, “विजय हजारे ट्रॉफी ही एक घरगुती एकदिवसीय स्पर्धा आहे जी फारसे लोक पाहत नाहीत. परंतु विराट आणि रोहितच्या सहभागामुळे लोक ती पाहण्यासाठी उपस्थित राहिले होते. मग प्रश्न असा आहे की, जेव्हा ते एकदिवसीय सामने खेळणे थांबवतील तेव्हा काय होईल?” असे देखील त्याने म्हटले आहे.
आश्विन म्हणाला की, “एकदिवसीय क्रिकेट हा एक उत्तम प्रकार होता, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनीसारखे खेळाडू तयार होत असत, जो १०-१५ षटकांसाठी एक धाव घेऊन डाव सांभाळत असे आणि नंतर शेवटी स्फोटक फलंदाजी करताना दिसत असे. आता, असे खेळाडू नाहीत आणि अशा प्रकारच्या फलंदाजीची गरज नाही, कारण वर्तुळात दोन नवीन चेंडू आणि पाच क्षेत्ररक्षक आहेत.”






