वादळी पावसाचा तडाखा; घरांचे छप्पर उडाले; संसार उघड्यावर
पुणे : पुणे शहरात मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने वेगवेगळ्या भागात झाडे कोसळण्याच्या तसेच रस्त्यात पाणी साचले गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्य करुन रस्त्यात पडलेल्या फांद्या, झाडे हटवून रस्ते वाहतुकीस खुले करुन दिले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. बुधवारी सकाळपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात ५४ ठिकाणी झाडे कोसळली.
पुणे शहरात मंगळवारी दुपारी पाऊस सुरू झाला. रात्री आठनंतर पावसाचा जोर वाढला. वादळी वारे तसेच जोरदर पावसामुळे वेगवेगळ्या भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. तसेच, फ्लेक्स पडल्याच्या तीन घटना देखील उपनगरांमध्ये घडल्या. त्यासोबतच रस्त्यांवर पाणी साचल्याचे व काही सोसायट्यांमध्येही पाणी साचले गेले होते.
अग्निशमन दलाने माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य सुरू केले. रस्त्यात पडलेल्या फांद्या, झाडे हटवून जवानांनी रस्ते वाहतुकीस खुले करुन दिले. घोरपडी, धानोरी, कोरेगाव पार्क, येरवडा, एरंडवणे, हडपसर, बावधन, मुकुंदनगर, एरंडवणे, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, वारजे माळवाडी, शंकरशेठ रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले पथ (फर्ग्युसन रस्ता), कोथरूड, शिवाजीनगर, घाेरपडी, विश्रांतवाडी भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात ५४ ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात कोणी गंभीर जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
शहरात मंगळवारी झालेल्या पावसामुळे पुणे-सातारा रस्त्यावरील पंचमी हॉटेलजवळ असलेल्या एसटी कॉलनीत पाण शिरले, तसेच वारजे परिसरातील चर्च, कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर असलेल्या अर्चना ग्रीन सोसायटीचे आवार, सहकारनगर भाग एक परिसरातील पॅसफिक हाईट्स सोसायटीच्या आवारात पाणी शिरले होते.
सीमाभिंत कोसळली
धनकवडीतील तीन हत्ती चौकात सीमाभिंत कोसळण्याची घटना घडली. तसेच सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द येथील अक्षय कॉम्प्लेक्स इमारतीतील सीमाभिंत कोसळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.