
फोटो सौजन्य - Social Media
वाशिम, ब्युरो : येथील कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना (PMFME) अंतर्गत क्षमता बांधणी व अन्न प्रक्रिया उद्योग या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रशिक्षण सभागृहात आयोजित या शिबिरात जिल्ह्यातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजक, बचत गट, महिला तसेच शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
या प्रशिक्षण शिबिराचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांना अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित तांत्रिक, व्यावसायिक तसेच उद्योजकता विकास विषयक सखोल आणि शास्त्रीय मार्गदर्शन देणे हा होता. कार्यक्रमात कृषी विभागाच्या उपसंचालक हीना शेख तसेच जिल्हा नोडल अधिकारी यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेची उद्दिष्टे, लाभार्थी निवड प्रक्रिया, अनुदानाची माहिती तसेच कर्ज संलग्नतेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उद्योजकांना आर्थिक आणि तांत्रिक आधार मिळून उद्योग उभारणीस चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात बोलताना कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर. एल. काळे यांनी सांगितले की, ही योजना ग्रामीण भागातील तरुण, महिला आणि शेतकऱ्यांसाठी शाश्वत स्वयंरोजगार निर्मितीची एक प्रभावी संधी आहे. अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतमालाला योग्य दर मिळतो, त्याचे गुणवत्तापूर्ण मूल्यवर्धन होते आणि व्यापक बाजारपेठ उपलब्ध होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते, असेही त्यांनी नमूद केले.
गृहविज्ञान विभागाच्या प्रमुख व जिल्हा प्रशिक्षक शुभांगी वाटाणे यांनी अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण, अन्न सुरक्षा मानके, पॅकेजिंग, ब्रँडिंग तसेच महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध व्यवसाय संधी यावर सखोल व तांत्रिक माहिती दिली. अन्न प्रक्रिया उद्योग करताना स्वच्छता, दर्जा आणि ग्राहकांचा विश्वास टिकवणे किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला. तसेच शासनाकडून मिळणाऱ्या विविध सहकार्य योजनांची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी डॉ. सुधीर देशमुख यांनी अन्न प्रक्रिया उद्योगातील उदयोन्मुख व्यवसाय संधी, शेतीमालाचे मूल्यवर्धन, बाजारपेठ व्यवस्थापन, विपणन धोरणे तसेच उद्योजकतेशी संबंधित विविध शास्त्रीय विषयांवर मार्गदर्शन केले. योग्य नियोजन, बाजाराचा अभ्यास आणि सातत्य ठेवल्यास अन्न प्रक्रिया उद्योगातून यशस्वी उद्योजक घडू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तीन दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिरामुळे सहभागी लाभार्थ्यांना अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्याबाबत आत्मविश्वास मिळाल्याचे दिसून आले. भविष्यात जिल्ह्यात अधिकाधिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभे राहून रोजगार निर्मितीला चालना मिळेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.