अकलूज येथे तीन पालखी सोहळ्यांचा असणार मुक्काम; नगरपरिषदेचे आहे विशेष नियोजन
अकलूज : महाराष्ट्रातील मानाच्या दहा पालखी सोहळ्यांपैकी तीन पालखी सोहळे एकाच दिवशी अकलूज येथे मुक्कामी येत आहेत. त्यांच्या सोयी-सुविधांकरिता अकलूज नगरपरिषदेला मोठी कसरत करावी लागणार आहे. असे असले तरी अकलूज नगरपरिषदेने पालखी सोहळ्यांच्या सुविधेसाठी विशेष नियोजन केले आहे.
यावर्षी अकलूज नगरपरिषदेला जिल्हा नियोजन समितीमार्फत सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून पालखी मार्ग परिसरात मुरमीकरण करण्यासाठी १० लाख रुपये व विद्युत पुरवठ्यासाठी ५ लाख रुपये असा १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. १ जुलै रोजी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सकाळी ८ वाजता, श्री सोपानकाका यांचा पालखी सोहळा सायंकाळी ४ वाजता व श्री चांगवाटेश्वर पालखी सोहळा सायंकाळी ५ वाजता अकलूज मुक्कामी येत आहेत. या सोहळ्यासोबत लाखो वैष्णवांची मांदियाळीही अकलूज येथे मुक्कामी असते.
श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा अकलूज येथे एकच दिवस मुक्काम असला तरी आदल्या दिवशी सदरचा पालखी सोहळा सराटी (जि. पुणे) येथे मुक्कामी असतो. सराटी व अकलूज (जि. सोलापूर) हे अंतर केवळ तीन किमी असल्याने हजारो वैष्णव आदल्या दिवशीच अकलूज मुकामी येतात. यामुळे अकलूजकरांवर दोन दिवस मुक्कामाची जबाबदारी येते.
नियोजित मुक्कामाच्या दिवशी वैष्णवांना अकलूज परिसरात ठिकठिकाणी अत्रदान होते. परंतु आदल्या दिवशीही त्यांना अन्नदानाची सुविधा मिळावी. या उद्देशाने जयसिंह मोहिते-पाटील यांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने अन्नदानाची परंपरा सुरू केली.
अकलूज नगरपरिषदेकडून महत्त्वपूर्ण नियोजन
अकलूज नगरपरिषदेने पाणी पुरवठा, वीज, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, बॅरिकेडींग, मंडप, दिवाबत्ती आदी विभागातील कामाचे नियोजन केले आहे. महिलांसाठी तीन हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत. शहरामध्ये दिंडी मुक्कामाची ठिकाण असलेले तोरसकर वस्ती व काळा ओढा माळेवाडी, अकलाई मंदिर परिसर, बहुउद्देशीय हॉल, जुने पोलिस स्टेशन, क्रीडा संकुल अशा ६ ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे व वापराच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करण्यात येत आहेत. तर बौद्ध विहार, अकलाई पालखी मुकाम व आवश्यक १३ ठिकाणी १५०० फिरते शौचालये उभारण्यात येणार आहेत.
महिलांना स्नानगृहाची सुविधा उपलब्ध करून देणार
मंदिर परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती, मच्छी मार्केट, क्रीडा संकुल या पाच ठिकाणी महिलांना स्नानगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संपूर्ण शहरातील हातपंप व विहिरीमध्ये टीसीएलचे नियोजन केले आहे. वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून योग्य ६ ठिकाणी बॅरेकेडोंग लावून मार्गावर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्तीचे व डांबरीकरणाचे काम सुरू आहे.
जंतुनाशक फवारणी करण्यात येणार
ठिकठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात येणार आहे. आषाढी कामांकरिता १३३ सफाई कामगार, २० लिपिक व अधिकारी असे जवळपास १५३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर १ हजार १३ घनमीटर मुरमीकरण व सात हजार चौ. फूट वॉटरप्रूफ मंडप करण्यात येणार आहे.
– दयानंद गोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, अकलूज नगरपरिषद.