येत्या १ एप्रिलपासून एक्स्प्रेस वे वरील टोलदरात ३ टक्क्यांनी वाढ
पुणे : महागाई कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आता टोल दरवाढीचाही फटका बसणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना एक एप्रिलपासून टोल दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांना अधिक पैसे खर्च करावे लागतील.
येत्या एक एप्रिलपासून पुणे-मुंबई महामार्गाच्या टोलमध्ये 3 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यानुसार, आता मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावरुन प्रवास करताना चारचाकी वाहनांच्या एकेरी प्रवासासाठी अतिरिक्त 5 रुपये मोजावे लागणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी 10 रुपये द्यावे लागतील. इतर श्रेणींतील वाहनांसाठी 15 ते 20 रुपयांपर्यंतची टोल दरवाढीचा निर्णय सरकारने घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत मोडणाऱ्या सर्व रस्त्यांवरही टोल दरवाढ होतील.
फास्टॅग नसल्यास दुप्पट टोलची वसुली
येत्या एक एप्रिलपासून प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅग लावणे अनिवार्य असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही रोख, कार्ड किंवा यूपीआयद्वारे टोल भरला. तर तुम्हाला टोलचे पैसे डबल भरावे लागतील. टोलची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि टोलवरील लागणारा वेळ आणि फास्ट टॅगचा गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक वाहनांना फास्ट टॅग लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
एसटी बसच्या तिकीटदरातही झाली होती वाढ
एसटी बस आणि खासगी वाहनांनी प्रवास करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. महाराष्ट्र सरकारने राज्य रस्ते वाहतूक बस, ऑटो आणि टॅक्सींच्या भाड्यात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. राज्य परिवहन विभागाने दिलेल्या मंजुरीनंतर राज्य परिवहन वाहनांचे वाढीव दर लागू करण्यात आले आहेत. तर टॅक्सी आणि वाहन भाड्यांबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी एक फेब्रुवारीपासून करण्यात आली आहे.