फोटो सौजन्य - Social Media
ठाण्याचे वृक्षपुरुष म्हणून ओळख असलेले विजयकुमार कट्टी यांच्या वृक्षारोपण उपक्रमाला राज्य सरकारकडून पाठबळ दिले जाणार असल्याची घोषणा महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केली. कर्जत तालुक्यातील वेणगाव येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्रात सुरू असलेल्या वृक्ष लागवड व लँडस्केप कामाची पाहणी करताना त्यांनी ही ग्वाही दिली. यावेळी त्यांनी विविध जातींच्या ६५०० झाडांची भेट विजयकुमार कट्टी यांना दिली.
श्रद्धा पुनर्वसन केंद्र हे मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. भरत वाटवाणी व डॉ. स्मिता वाटवाणी यांनी उभारले असून, येथे मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या रस्त्यावरच्या निराधार रुग्णांची सेवा केली जाते. या केंद्रात व्यावसायिक मानसोपचारतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने रुग्णांचे बचाव, निवारा, उपचार व पुनर्वसन केले जाते. आतापर्यंत ११,१४५ निराधारांना त्यांच्या कुटुंबांशी पुनःजोड देण्यात आली असून, यामध्ये ३,३५१ महिला आणि १५ बाळंत मातांचा समावेश आहे.
अदिती तटकरे यांनी श्रद्धा पुनर्वसन केंद्राचा सविस्तर दौरा केला. सुरुवातीला त्यांनी ९ मिनिटांचा माहितीपट पाहून कार्याची माहिती घेतली. त्यानंतर महिला कक्ष, विविध प्रकल्पांची आणि वृक्षारोपणाच्या कामांची पाहणी केली. त्यांनी विजयकुमार कट्टी यांच्या कल्पक वृक्ष लागवड उपक्रमाचे कौतुक करत, मानसिक रुग्णांसाठी सकारात्मक व नैसर्गिक वातावरण तयार करण्यात हरित परिसराचे महत्त्व मान्य केले.
कट्टी हे ठाण्यातील असून गेली काही महिने वेणगाव येथे राहून केंद्रात हरितक्रांती घडवत आहेत. त्यांनी याठिकाणी वेगवेगळ्या जातींची झाडे लावून लँडस्केपिंगचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या या प्रयत्नांचे मंत्री तटकरे यांनी विशेष कौतुक करत साडे सहा हजार झाडांची भेट दिली. या दौऱ्यात माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, डॉ. भरत व डॉ. स्मिता वाटवाणी, संस्थेचे सदस्य रमेश मुंढे, विजयकुमार कट्टी आदी उपस्थित होते.