चिपळूण कराड रासत्याबाबत मंत्री देसाईंचे प्रशासनाला निर्देश (फोटो -सोशल मिडिया)
मुंबई: कराड -चिपळूण दरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपायोजना करा. या मार्गात असलेली अतिक्रमणे काढून टाकण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
मुंबई येथून शासकीय निवास्थानाहून दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंत्री देसाई बोलत होते. यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, पाटणचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, पोलीस उपाधीक्षक विजय पाटील, राष्ट्रीय महामार्ग पुणेचे अधीक्षक अभियंता श्री. विभुते, तहसीलदार अनंत गुरव, राष्ट्रीय महामार्गच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक, यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कराड-चिपळूण महामार्गावरील राडा-रोडा प्राधान्याने काढावा, अशा सूचना करुन पालकमंत्री शंभुराज देसाई म्हणाले, या मार्गावरील वाहतुक सुरळीत व अपघात होणार नाहीत यासाठी प्राधान्याने खड्डे बुजवावेत. पावसामुळे महामार्गावर पाणी साठणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. रस्त्या शेजारी साईड पट्ट्या खचल्या आहेत अशा ठिकाणी त्या भरुन घ्याव्यात. हे काम येत्या आठ दिवसात करावे, असे निर्देश देऊन प्रांत, तहसीलदार व पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी कराड-चिपळूण मार्गाची पाहणी करुन उपाययोजना सुचवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.
मंत्री शंभुराज देसाईंचे स्पष्ट निर्देश
मान्सून कालावधीत जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून प्रत्यक्ष क्षेत्रपातळीवर जाऊन काम करावे. काम करीत असताना नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात. मान्सून कालावधीत अति पावसामुळे कोणत्याही गावाचा संपर्क तुटल्यास संपर्क पुन्हा प्रस्थापित करुन देण्याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात मान्सूनपूर्व आढावा बैठक पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Shambhuraj Desai: “जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून…”; मंत्री शंभुराज देसाईंचे स्पष्ट निर्देश
सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, असे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले, पावसामुळे जिथे शेती पिकांचे, पशुधनाचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे पाऊस उघडताच गतीने सुरु करावे. या पंचनाम्यातून एकही बाधित मदतीपासून वंचित राहू नये. दरड प्रवण गावांचे जीआयएस सर्व्हेक्षण झाले आहे. ज्या गावांचे स्थलांतर करण्याबाबत सांगितले आहे त्या गावांच्या स्थलांतरासाठी शासकीय जमिनीचा शोध घ्यावा.