तुकोबा पालखीचे आळंदीत उत्साहात स्वागत; फटाक्यांची आतिषबाजी, परिसर झाला भक्तिमय
आळंदी : श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यांचे आगमन आळंदी येथे भक्तिमय वातावरणात झाले. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जन्मोत्सव वर्षानिमित्त आणि संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या सदेह वैकुंठगमन वर्षानिमित्त पालख्या आळंदीत एकाच वेळी दाखल झाल्या. पालख्यांचे आगमन हरिनामाच्या गजरात, रांगोळ्यांच्या पायघड्या, पुष्पवृष्टी आणि लक्षवेधी फटाक्यांच्या आतिषबाजीसह मोठ्या जल्लोषात झाले.
अठरा वर्षांनंतर दोन्ही संतांच्या पालख्या एकाच वेळी परतीच्या वारीत आळंदीत आल्यामुळे विशेष उत्साह दिसून आला. हजारो भाविक, वारकरी, शालेय विद्यार्थी, वारकरी संप्रदायातील शिक्षण घेणारी मुले आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी पालख्यांचे जल्लोषात स्वागत केले. आळंदी नगरपरिषद चौकात काँग्रेसचे नंदकुमार वडगावकर यांच्या हस्ते पालखी सोहळ्याचे प्रमुख व माऊली देवस्थानचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे आणि पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
हेदेखील वाचा : काटेवाडीत रंगले मेढ्यांचे रिंगण, डोळ्याचे फिटले पारणे; पालखी सोहळा इंदापूर तालुक्यात दाखल
सोहळ्याच्या निमित्ताने पालखी सोहळ्यातील चोपदार, मानकरी, बैलसेवेचे मानकरी यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सुनील घुंडरे पाटील आणि नितीन घुंडरे पाटील यांनीही सोहळ्याचे स्वागत केले. उपस्थित भाविकांनी संतांच्या दर्शनाचा लाभ घेत भक्तिभावाने वातावरण भारावून गेले.
बारामतीतही केलं गेलं स्वागत
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे यापूर्वी बारामती मुक्काम झाल्यानंतर काटेवाडीमध्ये आगमन झाल्यानंतर मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले होते. काटेवाडीतील विसाव्यानंतर पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर काटेवाडी बस स्थानकाजवळ पालखीभोवती मेंढ्यांचे गोल रिंगण मोठ्या उत्साहात रंगले. टाळ मृदंगाच्या गजरात मेंढ्यांनी घेतलेल्या गोल रिंगणाने उपस्थित भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
परिसरातील वातावरण बनले उत्साहाचे
काटेवाडी या ठिकाणी पालखी सोहळ्याचे आगमन होताच गावातील विविध पदाधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले होते. परंपरेप्रमाणे परीट समाजाच्या वतीने धोतराच्या पायघड्या पालखी विसावा स्थळापर्यंत अंथरण्यात आल्या होत्या.