सौजन्य - नवराष्ट्र टीम
बारामती/ अमोल तोरणे : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बारामती मुक्कामानंतर काटेवाडी मध्ये आगमन झाल्यानंतर मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. काटेवाडीतील विसाव्यानंतर पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर काटेवाडी बस स्थानकाजवळ पालखीभोवती मेंढ्यांचे गोल रिंगण मोठ्या उत्साहात रंगले. टाळ मृदंगाच्या गजरात मेंढ्यांनी घेतलेल्या गोल रिंगणाने उपस्थित भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
बारामती शहरात गुरुवारी (दि २६) पालखी सोहळा मुक्काम स्थळी दाखल होताच खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आरती घेण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारी सकाळी पालखी सोहळ्याने पुढील मुक्कामासाठी प्रस्थान ठेवले. दरम्यान श्री छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रशांत काटे, संचालक अनिल काटे, उपसरपंच मिलिंद काटे, माजी सरपंच विद्याधर काटे, माजी उपसरपंच श्रीधर घुले, राजेंद्र पवार, अजित काटे, जितेंद्र काटे, प्रकाश काटे, ह. भ. प. सुनील काटे, अमर जगताप यांनी खांद्यावर पालखी घेऊन पालखी विसाव्यापर्यंत आणली. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
काटेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने वारकऱ्यांसाठी विविध सुविधा पुरविण्यात आल्या. गावातील विविध मंडळे, ग्रामस्थांनी वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता व जेवणाची सोय केली होती. दुपारच्या विसाव्यानंतर पालखी सोहळा सणसर मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. छत्रपती कारखान्याच्या वतीने कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी स्वागत केले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास गावडे यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते. सणसर ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच यशवंत पाटील, पोलीस पाटील राजेंद्र चव्हाण यांच्यासह इतरांनी स्वागत केले. कारखाना कार्यस्थळावर पालखी विसावल्यानंतर त्या ठिकाणी कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास गावडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. थोड्या वेळच्या विश्रांतीनंतर पालखी सोहळा सणसर मुक्कामी दाखल झाला.
विसाव्यापर्यंत धोतराच्या पायघड्या
काटेवाडी या ठिकाणी पालखी सोहळ्याचे आगमन होताच शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्यासह गावातील विविध पदाधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी परंपरेप्रमाणे परीट समाजाच्या वतीने धोतराच्या पायघड्या पालखी विसावा स्थळापर्यंत अंथरण्यात आल्या. काटेवाडीतील बाळासाहेब ननवरे, दत्तात्रय ननवरे, संतोष नांगरे, राहुल ननवरे यांनी ही परंपरा जपली आहे.
क्रीडामंत्र्यांनी केले पालखीचे सारथ्य
सायंकाळी पाचच्या सुमारास पालखी सोहळ्याचे इंदापूर तालुक्याचे प्रवेशद्वार असलेले भवानीनगर येथे आगमन होताच क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पालखी सोहळ्याचे इंदापूर तालुक्याच्या वतीने स्वागत केले. यावेळी क्रीडामंत्री भरणे यांनी पालखीचे सारथ्य देखील केले. तहसीलदार जीवन बनसोडे, इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी देखील स्वागत केले.
पालखी मार्ग हिरवाईने नटला
बारामती शहरातील मोतीबाग, बांदलवाडी, पिंपळी लिमटेक येथून मार्गक्रमण करत असताना भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. इंदापूर बारामती या मार्गावर नेहमीप्रमाणे असणारे हिरवेगार वृक्ष गेले तीन वर्षांपासून दिसत नसल्याने अनेक वारकरी हळहळ व्यक्त करत होते. मात्र यावेळी मे मध्येच पावसाने सरासरी ओलांडल्यामुळे पालखी मार्गाच्या सुरुवातीपासून दोन्ही बाजूने हिरवाईने नटलेला परिसर वैष्णवांना दिलासा देणारा ठरला.