Two more arrested by nia the number of accused has increased to nine
अमरावती : शहरातील पशुवैद्यकीय औषधी विक्रेता (Veterinary Drug Dealer ) उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांच्या बहुचर्चीत हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (National Investigation Agency) (एनआयए NIA ) पथकाने बुधवारी सकाळी आणखी दोघांना अटक केली आहे. मुर्शिद अहमद अब्दुल रशीद (४१, रा. ट्रान्ससपोर्ट नगर) व अब्दुल अरबाज अब्दुल सलीम (२३, रा. लालखडी) अशी आरोपींची नावे आहेत. या दोन आरोपींच्या अटकेनंतर आता या हत्याप्रकरणातील आरोपींची संख्या नऊ झाली आहे.
२१ जून रोजी रात्री उमेश कोल्हे यांची शाम चौकाजवळील महिला महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावर चाकूने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर कोतवाली पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून, दुसऱ्याच दिवशी दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीनंतर अन्य पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपींच्या चौकशीनंतर नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ सोशल मिडियावर पोस्ट (Social media Post) टाकल्याच्या कारणावरून उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवून सातही आरोपींना त्यांच्या ताब्यात देण्यात आले होते. तेव्हापासून या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयए करीत आहे.
एनआयएला अमरावती पोलीस (Amravati Police) तपासात सहकार्य करीत आहे. सदर प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने एनआयएचे पथक तीन दिवसांपूर्वी पुन्हा अमरावती शहरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी बुधवारी सकाळी या प्रकरणात मुर्शिद अहमद व अब्दुल अरबाज यांना अटक केली. या आरोपींनी निधी संकलन करणे आणि इतर आरोपींना आश्रय दिला, असा आरोप असल्याची माहिती पुढे आली.
एनआयएच्या पथकाने दोन्ही आरोपींची कसून चौकशी करून, त्यांना बुधवारी न्यायालया समक्ष हजर करण्यात आले. आरोपींच्या चौकशीकरिता त्यांना सोबत नेण्यासाठी एनआयएने न्यायालयाला परवानगी मागितली असून, ट्रॉन्जीट वॉरंटद्वारे आरोपींना ते मुंबईतील एनआयए (NIA in Mumbai) येथे नेणार आहे. तेथील एनआयएच्या न्यायालयात आरोपींना हजर करून कोठडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. एनआएचे पथक आरोपींच्या घरांची झडती घेणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एनआयएच्या पथकाने शहरातील काही ठिकाणी जाऊन पाहणी केली. तसेच आठ जणांना चौकशीकरिता पोलीस ठाण्यात बोलाविले होते. त्यांचे बयाण नोंदविण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.