प्रो कबड्डी स्पर्धेत युपी योद्धाज प्रथमच उपांत्य फेरीत, जयपूर पिंक पॅंथर्सवर ४६-१८ असा एकतर्फी विजय
पुणे : प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या बाद फेरीला अगदीच एकतर्फी सुरुवात झाली. भवानी राजपूत आणि गगन गौडाच्या परिपूर्ण चढायांच्या खेळाला हितेश, सुमित, महेंद्र सिंग या बचावफळीकडून मिळालेल्या तेवढ्याच तगड्या साथीमुळे युपी योद्धाज संघाने दोनवेळच्या माजी विजेत्या जयपूर पिंक पॅंथर्स संघाचा ४६-१८ असा २८ गुणांनी धुव्वा उडवून थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता त्यांची गाठ हरियाना स्टिलर्सशी पडणार आहे.
चढाईपटूंना बचावफळीची तगडी साथ
भवानी राजपूत आणि गगन गौडाच्या खोलवर चढायांनी आक्रमक सुरुवात करुन त्यांनी सामन्याला वेग दिला. त्याचवेळी त्यांचे बचावपटूही पूर्ण क्षमतेने साथ देत होते. युपीच्या उंचपुऱ्या चढाईपटूंना रोखण्यात जयपूरला अपयश आले. पूर्ण सामन्यात दोन्ही सत्रात प्रत्येकी दोन लोण असे चार लोण देत युपीने जयपूर संघाची कोंडी केली.सुरजित सिंगचा अनुभव त्यांच्या मदतीला येऊ शकला नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे जयपूरला केळ अर्जुन देशवालवर अवलंबून रहावे लागले. मात्र, आज त्याला लयच गवसली नाही. चार चढायात केवळ दोन गुण मिळविणाऱ्या अर्जुनला उत्तरार्धात बाहेर बसवण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे मध्यंतरातील १५ गुणांचे दडपण घेऊन उतरलेल्या जयपूर संघाला सामन्यात राहण्याचा मार्गच सापडला नाही. युपीकडून भवानी राजपूतने १२, तर बचावात हितेश आणि सुमितने अनुक्रमे ६ आणि ५ गुणांची कमाई केली. त्यांना महेंद्र सिंगने चार गुण मिळवत सुरेख साथ केली.
यूपी योद्धाचा सलग दहा विजय
सामन्याच्या पूर्वार्धात युपी योद्धाज संघाने कमालीच्या आत्मविश्वासाने खेळ केला. बचावफळी आणि चढाईपटू यांच्या सर्वांगीण खेळाच्या जोरावर युपी योद्धाजला सामन्यावर वर्चस्व राखणे कठिण गेले नाही. जयपूरच्या चढाईपटूंना आपली लय मिळवण्यात अपयश आले आणि बचावफळी आपली ताकद दाखवू शकली नाही. भवानी राजपूत आणि गगन गौडा या उंचपुऱ्या चढाईपटूंनी सातत्याने जयपूरच्या बचावफळीला आव्हान दिले. खोलवर चढाई करतानाच दोघांनी बचावपटूंना आपल्या अंगावर येण्यास भाग पाडले आणि या घाईचा फटका जयपूरला इतका बसला की त्यांना पूर्वार्धात बचावाच्या आघाडीवर एकही गुण मिळाला नाही. तुलनेत युपीने चढाईत ११ आणि बचावात ८ गुण मिळवले आणि दोन लोण चढवत मध्यंतरालाच २३-८ अशी मोठी निर्णायक आघाडी मिळवली होती.
यूपीची आता गाठ हरियाना स्टिलर्सशी
उत्तरार्धात फार वेगळे चित्र दिसले नाही. उत्तरार्धातील पहिल्या दहा मिनिटांत आणि दुसऱ्या दहा मिनिटाच्या सुरुवातीलाच लागोपाठ दोन लोण देत युपीने सामन्याचा निकाल स्पष्ट केला. उत्तरार्धातील अखेरच्या सत्राताल सुरुवात झाली, तेव्हा युपीची २६ गुणांची मोठी आघाडी होती. त्यामुळे युपी योद्धाज किती मोठ्या फरकाने विजय मिळविणार इतकीच औपचारिकता बाकी राहिली होती.