रायगड : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालामध्ये महायुतीला फटका बसला असून अजित पवार गटाला देखील मोठा धक्का बसला आहे. महायुतीमध्ये अजित पवार यांना तीन जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी फक्त एका जागेवर त्यांना यश आले आहे. बारामती व शिरुरची निवडणुक प्रतिष्ठेची असताना देखील अजित पवार गटाला अपयशाला सामोरे जावे लागले. सुनेत्रा पवार व शिवजीराव आढळराव पाटील यांचा लोकसभेमध्ये दारुण पराभव झाला आहे. यानंतर अजित पवार यांनी एनडीएच्या दिल्लीतील बैठकीला जाणे देखील टाळले. यानंतर आता त्यांच्यावर उत्तम जानकर यांनी निशाणा साधला आहे.
अजित पवारांनी गुरढोर बघत शेती सांभाळावी
उत्तम जानकर म्हणाले, अजित दादांना मी सांगितलं होतं की साहेबांना तुम्हाला मुख्यमंत्री करायचं आहे. शंभर पेक्षा अधिक आमदार यावेळेस निवडून आणायचे आहेत असं साहेबांच्या डोक्यात आहे आणि या संघर्षामध्ये तुम्ही सामील व्हा. अनिल देशमुख, संजय राऊत यांनी देखील जेलवाऱ्या केल्या आहे. तुम्हाला देखील आठ पंधरा दिवस जेलवारी करावी लागेल पण संघर्षातून तुम्ही उभे रहा परंतु त्या माणसाने शेवटी गटारीचे पाणी पिले जे व्हायचे ते झाले’, अशी घणाघाती टीका उत्तम जानकर यांनी अजित पवार यांच्यावर केली तर अजित पवारांनी गुरढोर बघत शेती सांभाळावी राजकारण सोडून द्यावे असा उत्तम जानकर यांचा खोटक टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
राज्यामधील लोकसभा निकाल
लोकसभेचा निकाल राज्यामध्ये व केंद्रामध्ये सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा लागला. 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला 300 पार देखील करता आले. स्वबळावर बहुमतचा आकडा न गाठल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड देखील उठवली. राज्यातील 48 जागांपैकी महायुतीला फक्त 17 जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीला 30 जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. महायुतीमध्ये भाजपला 9 शिंदे गटाला 7 तर अजित पवार गटाला केवळ एक जागा मिळाली आहे. तसेच ठाकरे गटाला 9 जागा आणि शरद पवार गटाला 8 जागा मिळाल्या आहेत. सर्वात जास्त जागा कॉंग्रेसला मिळाल्या असून 13 जागांवर कॉंग्रेस खासदार निवडून आले आहेत.