प्रकाश आंबेडकर यांची ओबीसी बचाव यात्रा
मुंबई : मराठा व ओबीसी आरक्षण यावरुन नेत्यांमध्ये खडाजंगी होताना दिसत आहे. ओबीसीमधून आऱक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटील आग्रही आहेत. तर मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे अशी ओबीसी नेत्यांची मागणी आहे. त्यामुळे आरक्षण प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आज उपोषण स्थगित केले असले तरी अनेकांनी नेत्यांनी त्यांच्या भूमिकेला आणि वादग्रस्त विधानांना विरोध दर्शवला आहे. यामध्ये अजित पवार गटाचे छगन भुजबळ, भाजपचे प्रकाश लाड व प्रविण दरेकर तसेच लक्ष्मण हाके यांनी देखील जरांगे पाटलांविरोधात आवाज उठवला आहे. आता यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील उडी घेतली आहे. ओबीसी बचाव यात्रा काढत ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी शरद पवार व जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत ओबीसी बचाव यात्रेबाबत मत व्यक्त केले. ते म्हणाले, एकंदरीत राजकीय पक्षांच्या भूमिका आपण पाहिल्यात तर महत्वाच्या विषयावर ते लक्ष देत नाहीत, हीच आताही परिस्थिती आहे. ओबीसी आणि मराठा एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. मात्र, अशावेळेस राजकीय पक्ष आणि नेत्यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. हे पक्ष जातींचे पक्ष आहेत, श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार पक्ष,काँग्रेस आणि अजित पवार यांचा पक्ष तर कायस्थ प्रभू म्हणजे भाजप व शिवसेना उबाठा यांचा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही उद्यापासून आरक्षण बचाव यात्रा काढत आहोत. चैत्यभूमीवरुन ही यात्रा सुरु होईल, मग पुण्यात फुले वाडा, नंतर अनेक जिल्हे करत पुढे औरंगाबाद येथे 7 ऑगस्ट रोजी यात्रेची सांगता होईल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
ओबीसी समाज घाबरलेला
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. यावेळी राज्यातील ओबीसी समाज घाबरलेला आहे असे देखील ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्यातील ओबीसी सध्या घाबरलेला आहे. लहान ओबीसी कार्यकर्त्यांवर हल्ला होत आहेत. त्यामुळे शांतता प्रस्थापित व्हावी हाच उद्देश यात्रेमागे आहे. ही गंभीर परिस्थिती आहे, जरांगे पाटील थेट त्यांना आरक्षण द्या, नाहीतर आरक्षण रद्द करा म्हणत आहेत. तसेच, 225 निवडून आणणार असं नेते म्हणतात. आपलं आरक्षण जाईल असं ओबीसींना वाटत आहे. त्यामुळे जिथं वाईट प्रकार झालाय, तिथं आळा घालण्याचं काम आम्ही करू, असे स्पष्ट मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडले.
राज्यकर्ते दिशाभूल करत आहेत
तसेच त्यांनी यात्रेला शरद पवार, छगन भुजबळ यांना आमंत्रित केले आहे. मात्र कोणतीही प्रतिक्रिया न आल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, अनेक ओबीसी संघटना, नेते, शरद पवार यांनीही यात्रेत यावं, असं आम्ही आमंत्रण दिलंय, निमंत्रण दिलंय. पण, त्यांनी कोणीही काही रिप्लाय दिला नाही. दुर्दैवाने फटका बसेल म्हणून राजकीय नेत्यांनी काही भूमिका घेतली नाही. सामान्य माणसाला दिशा देणारं कोणीही नाही. आम्ही म्हणतोय मराठ्यांना आरक्षण देणं शक्य नाही. पण, हे राज्यकर्ते आहेत, खरी परिस्थिती न सांगता दिशाभूल करत आहेत, असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.