
विजया पाटील यांनी तासगाव नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला; संजय पाटील गटाची पालिकेवर हॅट्ट्रिक
नगरपालिकेची ही निवडणूक माजी खासदार संजय पाटील आणि आमदार रोहित पाटील या पारंपरिक प्रतिस्पर्धी गटांमध्ये अत्यंत चुरशीची ठरली होती. लोकसभा व विधानसभेतील पराभवानंतर संजय पाटील यांच्यासाठी ही लढत अस्तित्वाची, तर आमदार रोहित पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. त्यामुळे दोन्ही गटांनी प्रचारात पूर्ण ताकद पणाला लावली होती.
मतमोजणीअंती संजय पाटील गटाने नगराध्यक्षपदासह १३ जागांवर विजय मिळवत बाजी मारली. रोहित पाटील गटाला ११ जागांवर समाधान मानावे लागले. नगराध्यक्षपदाच्या थेट लढतीत रोहित पाटील गटाच्या उमेदवार वासंती सावंत यांचा अवघ्या ९९ मतांनी निसटता पराभव झाला. या विजयासह संजय पाटील गटाने पालिकेवरील सत्ता सलग तिसऱ्यांदा कायम राखली.
सत्तास्थापनेनंतर विजया पाटील यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांसह कार्यभार स्वीकारला. यानिमित्त शहरातून रॅली काढण्यात आली. या वेळी संजय पाटील, प्रभाकर पाटील आणि बाबासाहेब पाटील यांनी नागरिकांचे आभार मानले. कार्यभार स्वीकारताना विजया पाटील यांनी स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, नागरी सुविधा आणि पायाभूत विकासकामांना प्राधान्य देत तासगावच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे स्पष्ट केले.