Santosh Deshmukh murder accused walmik Karad given VIP treatment in Beed Jail
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर समोर आलेल्या खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आज वाल्मिक कराडला बीडच्या न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान वाल्मिक कराडच्या पत्नी मंजिली कराड यांनी, माझ्या नवऱ्यावर अन्याय झाला आहे, मला कोण न्याय देणार? असा सवाल केला आहे.
मंजिली कराड म्हणाल्या, “आज संतोष देशमुख यांचे कुटुंबीय न्याय मागायला मनोज जरांगे यांच्याकडे जात आहेत. माझ्या नवऱ्यावर सुद्धा अन्याय झाला आहे. मी माझ्या नवऱ्यासाठी न्याय मागतेय, मला न्याय कोण देणार आहे. मीडिया ट्रायल करून माझ्या नवऱ्याची एक एक गोष्ट बाहेर काढत आहेत. ज्यांनी ज्यांनी हे केले, त्यांचीही प्रकरणे मी बाहेर काढणार आहे. यामध्ये सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनावणे आणि अंजली दमानिया यांच्याही काही गोष्टी मी बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
“आज कराडवर जे राजकीय नेते आरोप करत आहेत. तेच एकेकाळी कराडकडून मदत घेत होते. आज त्यांच्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी माझ्या पतीचा बळी देऊ नये. आज आरोप करणाऱ्यांनी कराडचा वापर करून घेतला. निवडून येण्यासाठी त्यांना माझ्या पतीचे सहकार्य पाहिजे होते. पण आज निवडून आल्यानंतर सत्तेत पद मिळविण्यासाठी माझ्या पतीचा बळी दिला जात आहे.” यावेळी वाल्मिक कराडच्या पत्नीने आमदार सुरेश धस, मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्यावरही आरोप केले होते.
वाल्मिक कराडला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आजही परळीत आंदोलन सुरू असून, कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली. बीड शहरात वाल्मिक कराड समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. वाल्मिक कराडची ७५ वर्षांची आई आणि पत्नीही या आंदोलनात सहभागी आहेत. यावेळी त्याच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना, कराडवरील आरोप फेटाळून लावले आहेत.