
वर्ध्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबता थांबेना; 9 महिन्यांत 107 शेतकऱ्यांची आत्महत्या
वर्धा : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. दरवर्षी चांगल्या उत्पन्नाची आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांना कधी अतिवृष्टी, तर कधी अल्प पावसाचा सामना करावा लागत आहे. त्यातच वाढती महागाई आणि उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. या दुहेरी संकटामुळे शेतकरी हतबल होत असून, प्रशासनाच्या अहवालानुसार जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात जिल्ह्यात १०७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील बहुतांश आत्महत्या कर्जबाजारीपणा आणि आर्थिक विवंचनेतून झाल्याचे समोर आले आहे.
गेल्यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला होता. तर यंदा अत्यल्प पावसामुळे पिके धोक्यात आली. शासनाने जिल्ह्यातील आठपैकी सात तहसील दुष्काळग्रस्त घोषित करून नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. सध्या प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते आणि अन्य कृषी निविष्ठा खरेदी करून मोठ्या मेहनतीने पिके उभी केली. मात्र, पावसाअभावी पिके करपण्याची वेळ आली आहे.
26 वर्षांत 2830 शेतकरी आत्महत्या
जिल्ह्यात पहिली शेतकरी आत्महत्या २००१ मध्ये नोंदविण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंतच्या २६ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात २८३० शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे नोंदविण्यात आली आहे. यापैकी १४४२ प्रकरणे पात्र तर १३७२ प्रकरणे अपात्र ठरली आहे. उर्वरित प्रकरणांबाबत प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात आली आहे.
शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार
कर्जामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास बँकांना जबाबदार धरण्यात येणार असल्याची माहिती दुष्काळ निवारण उपसमिती अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रविवारी आले होते. चारा टंचाई, पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्याबाबत उपाययोजना आगामी काळात करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात चार महिने पुरेल एवढाच जनावरांसाठीचा चारा शिल्लक असून, त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती दिली.
Jalgaon News : ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा