
फोटो सौजन्य - Social Media
देहदान व अवयवदान हे केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरते मर्यादित नसून समाजातील मानवतेचे सर्वोच्च प्रतीक असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले. एका व्यक्तीचा देह व अवयव अनेक रुग्णांना नवे जीवन देऊ शकतात तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला मोलाची दिशा देतात. समाजात देहदान व अवयवदानाबाबत असलेले गैरसमज दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे ही आजची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी केंद्र व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देहदान जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाला जिल्हा प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
या कार्यक्रमाला वाशिम नगर परिषदेचे नगराध्यक्ष अनिल केंदळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सतीन मेश्राम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अविनाश पुरी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी केंद्राच्या अधिक्षिका डॉ. नयना सारडा, माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला धूपे, अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. धरमसिंग पवार, मोटार वाहन निरीक्षक गजानन हरणे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रविदास विनकरे, प्रा. राजेश घुगे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. तसेच धर्मगुरू प्रज्ञापाल भंते, पंकजदेव महाराज, जनार्दन मगर, हरिदास बनसोड व सामाजिक कार्यकर्ते अविनाश मारशेटवार यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
नगराध्यक्ष अनिल केंदळे यांनी या सामाजिक उपक्रमासाठी नगर परिषदेमार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. आय बँक स्थापन करण्यासाठी निश्चित प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात तज्ज्ञांनी देहदान व अवयवदानाचे महत्त्व सविस्तरपणे स्पष्ट केले. डॉ. हर्षाली जाधव यांनी अवयवदानाबाबत मार्गदर्शन करत उपस्थितांना अवयवदानाचा संकल्प करण्याचे आवाहन केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अविनाश पुरी यांनी नेत्रदानाचे महत्त्व विशद करून नेत्रदानामुळे अंध व्यक्तींना नवे दृष्टीजीवन मिळू शकते, असे सांगितले.
यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला धूपे, डॉ. नयना सारडा, धर्मगुरू पंकजदेव महाराज, प्रज्ञापाल भंते, अविनाश मारशेटवार, जनार्दन मगर तसेच मोटार वाहन निरीक्षक गजानन हरणे यांनीही देहदान व अवयवदानाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. अधिष्ठाता डॉ. सतीन मेश्राम यांनी शवचिकित्सेसाठी देहदान किती आवश्यक आहे हे स्पष्ट करताना वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देहदानाचा मोठा उपयोग होत असल्याचे सांगितले. स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेत पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एन. ए. रहेमान यांनी केले. त्यांनी देहदानाचे सामाजिक, शैक्षणिक व वैज्ञानिक महत्त्व सविस्तरपणे उपस्थितांना समजावून सांगितले. आभारप्रदर्शन डॉ. मयुरी पवार यांनी केले. कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.