
फोटो सौजन्य - Social Media
स्थानिक मानकर डेंटल क्लिनिकच्या १० व्या यशस्वी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘द ग्रेट डेंटल डूडल कॉन्टेस्ट’ या भव्य चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या स्पर्धेत शहरातील विविध शाळांमधील तब्बल १८०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी आपल्या रंगीत कल्पनांमधून दंत आरोग्याचे महत्त्व प्रभावीपणे मांडत समाजात जनजागृती करण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खामगावच्या प्रथम नागरिक अपर्णा फुंडकर उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर तज्ज्ञ दंतवैद्य डॉ. गोपाल सोनी, डॉ. प्रकाश मालू, डॉ. संजीव राठोड, डॉ. चेतन सातोते, डॉ. सुमित दुसाद, अपर्णा सातीते, डॉ. प्रदीप राठी, तसेच मधुर अग्रवाल, विश्वास चितलांगे आणि छडी सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात बोलताना अपर्णा फुंडकर यांनी १८०० विद्यार्थ्यांच्या सहभागाचे विशेष कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे लहान वयातच मुलांमध्ये आरोग्यविषयक सवयी रुजतात आणि दंत आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो, असे त्यांनी नमूद केले. चित्रकलेसारख्या सर्जनशील माध्यमातून दिलेला आरोग्याचा संदेश अधिक परिणामकारक ठरतो, असेही त्या म्हणाल्या.
मानकर डेंटल क्लिनिकचे संचालक डॉ. सम्राट मानकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, गेल्या १० वर्षांत क्लिनिकने ५५ हजारांहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांचा विश्वास संपादन केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार उपचार आणि रुग्णसेवेला प्राधान्य देणे, हेच क्लिनिकच्या यशाचे गमक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजात दंत आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्पर्धेतील विविध वयोगटांतील एकूण ३९ विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाला शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, कला शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन सत्रांत पार पडलेल्या या सोहळ्याचे नेटके व शिस्तबद्ध नियोजन मानकर डेंटल क्लिनिकच्या संपूर्ण टीमने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल डॉ. सोनिका मानकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.