पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला गळती; छतावरून येतंय पाणी
पंढरपूर : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला गळती लागली आहे. गुरुवारी (दि.24) दुपारी झालेल्या पावसात मंदिराच्या छताला गळती लागल्याचं दिसून आले आहे. मंदिराच्या संवर्धनाचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून, बेजबाबदार प्रशासकीय अधिकारी व संबंधित ठेकेदारावर तातडीने कारवाई करावी. अन्यथा आंदोलन करू, असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला.
गणेश अंकुशराव हे मंदिरात दर्शनासाठी गेले असताना संपूर्ण मंदिर गळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी या घटनेचे छायाचित्रे काढली, व्हिडिओ काढले असून, मंदिर समितीच्या मंदिर संवर्धनाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दाखवून दिले. हजारो वर्षांपासूनचे पुरातन श्रीविठ्ठल मंदिर असे पावसाळ्यात गळत असल्याचे कधी दिसले नाही. मात्र, मंदिराचे संवर्धनाचे काम झाल्यानंतर असे विदारक चित्र दिसून येत आहे. या संपूर्ण कामात खूप मोठा भ्रष्ट कारभार झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंदिरात आले होते. त्यांनी सुध्दा मंदिर संवर्धनाचे कामकाजाची पाहणी करायला हवी होती. परंतु तसे घडले नाही. मंदिर समिती प्रशासनाकडून या कामात मोठा घोटाळा झाला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने संबंधित बेजबाबदार प्रशासकीय अधिकारी व ठेकेदारांची व या कामाची सखोल चौकशी करावी. अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.
पंढरीच्या राजाला सोन्याचे दागिने
यापूर्वी या मंदिरात अनेक विठ्ठलभक्तांनी पंढरीच्या राजाला सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेलं होतं. हे आधीच्या काळातील परंपरिक दागिने आजही जपून ठेवण्यात आलेले आहेत. या दागिन्यांचा काळ जाणून घ्यायचा झालाच तर अंदाजे हे 700 वर्ष जुने दागिने असल्याचं म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी असलेल्या राजे-महाराजांनी दान केलेले कोणते दागिने कधी चढवायचे याबाबत देखील विशेष काळजी घेतली जाते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी सकवारबाई, संभाजीपुत्र छत्रपती शाहू महाराज, बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, शिंदे सरकार, अहिल्याबाई होळकर, नाना फडणवीस यांनी अनेकदा श्री विठ्ठल-रुक्मिणीला हे मौल्यवान दागिने अर्पण केले होते. या मंदिराला एकप्रकारचा इतिहास आहे.