जत/जॉकेश आदाटे: उन्हाची तीव्रता प्रचंड वाढू लागली आहे. जत तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात झपाट्याने वाढ होत आल्याचे दिसून येत आहे, एप्रिल महिन्याच्या मध्यावर उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. या उष्णतेमुळे जमिनीतील पाणी अधिक वेगाने कमी होत असून, याचा थेट परिणाम भूजल पातळीवर होत आहे. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये विहिरी, बोअरवेल कोरड्या पडू लागल्या आहेत, नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा देखील तीव्र तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे विहीर, कुपनलिका पुनर्भरणाच्या उपाययोजना तातडीने राबवा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
जत तालुका अतिशय कमी पर्जन्यमानाच्या भागात मोडतो. दरवर्षी मर्यादित पावसामुळेच येथे पाणीटंचाई जाणवते. मात्र यंदाच्या वर्षीचा उन्हाळा विशेषतः तापदायक ठरत असून, सध्याच्या वातावरणात दिवसागणिक तापमान वाढत आहे. हवामान विभागाच्या अहवालानुसार पुढील काही दिवस तापमान ४२ ते ४४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तालुक्यातील सोन्याळ, माडग्याळ, जाडरबोबलाद, उटगी, उमदी, संख आदी गावांमध्ये भूजल पातळी ९०० ते १००० फुटांपेक्षा खाली गेली आहे. शेतकऱ्यांनी खोदलेल्या बोअरवेलमधूनही आता पाणी येणे मंदावले आहे. काही ठिकाणी पाण्यासाठी बोअर ३ ते ४ वेळा खोदण्यात आल्या, तरीही पाणी लागत नाही, अशी माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पाणीटंचाईचा थेट परिणाम शेती आणि पाळीव जनावरांवर होत आहे.
काही शेतकऱ्यांनी भाजीपाला, ऊस व आदी फळपिकांची लागवड केली होती. मात्र पाण्याअभावी पीक करपण्याच्या अवस्थेत आहेत. जनावरांच्या पाण्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागत असून काही गावांमध्ये पाण्याच्या खासगी टँकरने पिण्यासाठी व जनावरांना पाणी घ्यावे लागत आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढली आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक जलसाठा सिंचन प्रकल्पांमध्ये दिसत असला, तरी गेल्या महिनाभरात यात झपाट्याने घट झाल्याचे दिसून येते आहे. जत तालुक्यात पाण्यासाठी एकूण २७ प्रकल्प राबवले जात आहेत. त्यामध्ये एकूण ९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन महिन्यात पाणी जपून वापरावे लागणार आहे.
जत शहरात देखील प्रचंड पाणीटंचाई जाणवू लागली आहे. जत शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या बिर्नाळ तलावात मुबलक पाणीसाठा असला तरी जत शहराला आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल सुरू आहेत. परिणामी नागरिकांना टँकरने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.