
Gulabrao Patil Controversy:
मुंबई: उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व गावांमध्ये पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पाणी पुरवठा योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयात आयोजित धुळे जिल्ह्यातील तसेच शेगाव पाथर्डी मतदारसंघातील गावांच्या पाणी पुरवठा योजनांच्या आढावा बैठकीत गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार मोनिका राजळे, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पाटील शिंदखेडा तालुक्यातील (जि.धुळे) जल जीवन मिशन अतंर्गत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी योजनांतर्गत कामांची पूर्तता विहीत कालमर्यादेत केली जात नाही, अशा विलंबाने काम करत असलेल्या संबंधित कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करुन नोटीस बजावण्यात यावी. कामे हस्तांतरित करुन गतीने पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. धुळे जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या शिंदखेडा गावात नवीन जलकुंभ उभारण्याचे काम तातडीने पूर्ण करावे जेणेकरुन उन्हाळ्यात त्या ठिकाणी ग्रामस्थांना पाणीपुरवठा सहजतेने उपलब्ध राहील, असेही पाटील यांनी सांगितले.
पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी धुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिसरातील गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांतर्गत कामे दर्जेदार आणि कालमर्यादेत पूर्ण होणे गरजेचे असल्याचे तसेच त्यादृष्टीने संबंधित सर्व यंत्रणांनी तातडीने क्षेत्र पाहणी करुन वेळेत कामांची पूर्तता करण्याचे सूचित केले.
यावेळी शेगाव, पाथर्डी व परिसरातील गावात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत सुरु असलेल्या कामांचाही आढावा घेण्यात आला. ही सर्व कामे गतीने पूर्ण करावीत. योजना अंमलबजावणीतील अडचणी तत्परतेने दूर कराव्यात. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्थानिक आमदार, सरपंच तसेच शिक्षण समिती अध्यक्ष यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घ्यावा.
Khadakwasla Dam: ‘या’ महत्वाच्या प्रोजेक्टमुळे होणार खडकवासला धरणाच्या २.१८ टीएमसी पाण्याची बचत
गावातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात, पाण्याची टाकी बसवण्यासाठी जागा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. उन्हाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची टाकी बसवण्याची कामे तातडीने सुरू करावी. तसेच गावात विहित मुदतीत काम पूर्ण न केलेल्या कंत्राटदारांवर नियमानुसार दंड आकारण्यात यावा. सर्व गावात योजना अमंलबजावणीसाठी उपयुक्त जागा पाहणी करून त्याची माहिती संबंधितांनी आढावा बैठकीत सादर करावी, अशा सूचना गुलाबराव पाटील यांनी दिल्या.
बैठकीत शेगाव, पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भगवान गड व ४६ गावांतील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच अमरापूर- माळीबाभुळगाव, बोधेगाव, शहरटाकळी या गावातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत चाकण औद्योगिक वसाहत व १९ गावातील पाणीपुरवठा योजनाच्या कामांचाही यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.