सोलापूर : आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा ताफा अडविण्याचा इशारा लोकशासन आंदोलन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरे यांनी याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना लेखी निवेदन दिले आहे. माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची नुकतीच सभा झाली.
सभेत माळशिरसचे भाजपचे आमदार राम सातपुते यांनी जिल्हा परिषदेतील दलितवस्ती विकास योजनेतील कामाच्या वाटपात भ्रष्टाचार होत असल्याबाबत तक्रार केली होती. संबंधित अधिकारी टक्केवारी घेऊन कामे वाटप करतात असा खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. यावर माझे पालकमंत्री भरणे यांनी अधिकाऱ्याचे नाव सांगा, त्याला तात्काळ निलंबित करतो, अशी घोषणा केली होती. आमदार सातपुते यांनी समाज कल्याण विभागाच्या प्रभारी अधिकारी चंचल पाटील व मंदिर क्लार्क नरळे यांची नावे सांगितली होती. त्यानंतर मात्र भरणे यांनी या दोघांचा पदभार तात्काळ बदला, असे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते. त्यानंतर आत्तापर्यंत काहीच न झाल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी दिंडोरे यांनी हा इशारा दिल्याचे सांगितले.
प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्याविरुद्ध बऱ्याच तक्रारी आहेत. ग्रामपंचायत विभागाचा पदभार असताना त्यांनी अपहार करणाऱ्या ग्रामसेवकांच्या चौकशी प्रलंबित ठेवल्या. माझी वसुंधरा अभियानासाठी वर्गणीवरून गोंधळ निर्माण केला. शासन विभागाची जबाबदारी सांभाळताना चुकीच्या बदल्या व पदोन्नती केल्या.
…तर मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडविणार
जिल्हा परिषदेवर प्रशासक लागू झाल्यावर पदाधिकाऱ्यांच्या जमा झालेल्या गाड्या वापरात आणण्याऐवजी भाड्याच्या गाड्या वापरात ठेवून जिल्हा परिषदेचे आर्थिक नुकसान केले. या सर्व प्रकरणांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी दिंडोरे यांनी केली आहे. नियोजन सभेत झालेल्या निर्णयाची जिल्हाधिकारी शंभरकर यांनी तात्काळ अंमलबजावणी न केल्यास आषाढीवारीच्या पूजेसाठी येणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा अडविणार असल्याचा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे.