फोटो सौजन्य -iStock
गेल्या 2 दिवसांपासून मुंबई उपनगराला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. आज देखील मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिमझिम सुरु आहे. हवामान विभागाने आज मुंबईसह पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. काल मुसळधार पावसानंतर आज ठाणे जिल्ह्यांत पावसाने विश्रांती घेतली आहे. पाऊस नसला तरी रस्त्यांमधील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
हेदेखील वाचा – गडचिरोलीत मुसळधार पाऊस; झिंगानूर ते कल्लेड मार्गावरील वाहतूक ठप्प
ठाणे ते मुंबई मार्गावरील रस्ते वाहतूक संथगतीने सुरु आहे. ठाणे ते मुलुंड टोलनाका दरम्यान असलेल्या खड्ड्यांमुळे चालक त्रस्त झाले आहेत. खड्ड्यांमधून वाहन चालवताना चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ठाणे ते मुलुंड दरम्यान असलेली सिग्नल यंत्रणा आणि टोल नाक्यामुळे या मार्गावरील वाहतूक अत्यंत संथगतीने सुरु आहे. त्यामुळे वाहन चालक हैराण झाले आहेत.
रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या भागात पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केलं आहे. तर हवामान विभागाने आज मुंबई, पुणे, रायगड, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईत पावसाची संततधार कायम आहे. ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि विदर्भ या भागांत हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यात आज ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्यात उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
हेदेखील वाचा – सांगलीत पावसाची धुवाधार बॅटिंग! कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळी वाढ; औदुंबर दत्त मंदिरात शिरलं पाणी
कोल्हापूर आणि सातारा या भागांत सततच्या सुरु असणाऱ्या पावासामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीला पूर आला आहे. नदीची पाणी पातळी ही ४० फुटांवर गेली आहे. तर ७८ बंधारे पाण्याखाली आहेत. पुरामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा स्थगीत करण्यात आल्या आहेत. तर साताऱ्यात देखील पावासाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक विद्यालयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. परिक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच जारी केलं जाईल, असं विद्यालय प्रशासनाने सांगितलं आहे.