ओतूर : गेली आठवडाभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी साचून शेतकऱ्यांंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेली काही रात्रंदिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिल्हेवाडी, उदापूर, नेतवड, माळवाडी, डिंगोरे, बल्लाळवाडी, ठिकेकरवाडी, हिवरेखुर्द, ओझर आदी गावातील शेतकऱ्यांंच्या शेतात उभ्या पिकात पाणी साचल्याने काकडी, मिरची, सिमला मिरची, टोमँटो, मेथी, कोथिंबीर, भेंडी, गवार आदी पिकांचे पुर्णता नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांंनी काबाडकष्ट करून पिकांसाठी खते व फवारणीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे.शेतात पाणी साचल्याने उभी पिक सोडून देण्याची वेळ आली आहे, तर अति पावसामुळे पिके सडून गेलेली आहे.
पिकांवर बुरशीजन्य रोग
तसेच काही पिकांवर बुरशीजन्य रोग पडल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.गेली आठवडाभर रात्रंदिवस सूरू असलेला पाऊस कुठे थांबायचं नाव घेत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांनी पिकांसाठी केलेला लाखो रूपयांचा खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झालेली आहे.
कांदाचाळीत पावसाचे पाणी
तसेच शेतकऱ्यांनी कांदा साठवण्यासाठी तयार केलेल्या कांदाचाळीत पावसाचे पाणी शिरल्याने कांदा सडून कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली असून शेतात पाणी साचले आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर शेतकऱ्यांवर तुबार पेरणीचे संकट येईल.
भात शेतीचे मोठे नुकसान
तसेच जुन्नर तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील कोपरे, मांडवे, मुथाळणे, मढ, खुबी, पिंपळगाव जोगा, खिरेश्वर ह्या भागातील आदिवासी शेतकऱ्यांचे भात शेतीचे मोठे पीक असते. या भागात गेल्या आठवड्यापासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे येथील शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत होऊन धो -धो पावसामुळे भात खाचरे वाहून गेली.
शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
तसेच भात लावणीसाठी तयार झालेली रोपे देखील वाहून गेल्याने या शेतकऱ्यांपुढे चिंता ओढवली आहे. मुसळधार पावसामुळे ओढे, नद्या, नाल्यांना पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या विहिरींच्या पाण्याची पातळीत वाढ होणार आहे. बळीराजा पावसामुळे सुखावला असला तरी, अतिवृष्टी मुळे होणाऱ्या शेतीमालाच्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.