Mumbai Lok Sabha Election 2024 : मुंबईत मतदान सुरु असताना उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर जोरदार टीका करीत गंभीर आरोप केले होते. आता त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार करीत, आम्हीच पहिल्यांदा निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. आणि आता उद्धव ठाकरे नेहमीचे रडगाणे गात आहेत, असा टोलाही लगावला. मुंबईत काही ठिकाणी जाणीवपूर्वक संथ गतीने मतदान सुरू आहे. मुंबईत काही ठिकाणी जाणीवपूर्वक संथ गतीने मतदान सुरु असून, निवडणूक आयोग भाजपची चाकरी करीत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता.
जाणीवपूर्वक संथ गतीने मतदान सुरु
मुंबईत ज्या ठिकाणी शिवसेनेची मते आहेत, त्या ठिकाणी जाणीवपूर्वक संथ गतीने मतदान सुरु असून निवडणूक आयोग भाजपची चाकरी करीत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. या आरोपाला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पराभव दिसू लागल्याने उद्धव ठाकरेंनी नेहमीप्रमाणे रडगाणे सुरू केले आहे, असे त्यांनी सांगितले. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करीत त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली होती. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे सुरू केले आहे. ४ जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा
पुढे बोलताना, माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. ६ वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले
मुंबईत संथगतीने मतदान सुरु असल्याच्या तक्रारींनंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. तसेच त्यांनी भाजपालाही लक्ष्य केलं होतं. “आज महाराष्ट्रातील मतदानाचा शेवटचा टप्पा आहे. त्यासाठी शेवटचे काही तास बाकी आहेत. यावेळी मतदारांमध्येही उत्साह आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवर मतदारांची खूप गर्दी आहे. मात्र, ज्या मतदान केंद्रावर शिवसेनेची मते आहेत, तिथे मतदान प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. पराभवाच्या भीतीने जाणीवपूर्वक हा प्रकार सुरू आहे. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असून ते केवळ भाजपाच्या इशाऱ्यावर काम करते आहे”, असे ते म्हणाले होते.