मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना उदयनराजे यांनी पवारांवर गंभीर आरोप करताना म्हटले की, “पवारांनी चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले, तसेच केंद्रात महत्त्वाच्या पदांवर काम केले, तरीही त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही?” उदयनराजे यांच्या मते, १९९४ मध्ये शरद पवार यांनी काढलेल्या अधिसूचनेमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचे दरवाजे कायमस्वरूपी बंद झाले.
जाणता राजा म्हणवून घेणाऱ्या पवारांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यास कधीच प्राधान्य दिले नाही
“पवार गेल्या पंच्चाहत्तर वर्षात ६५ वर्षे सत्तेच्या केंद्रस्थानी होते. मग एवढा काळ सत्ता उपभोगत असताना, मराठा समाजाचे दु:ख त्यांना का लक्षात आले नाही?” असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला. त्यांनी असेही म्हटले की, “स्वतःला ‘जाणता राजा’ म्हणवून घेणाऱ्या पवारांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यास कधीच प्राधान्य दिले नाही.” यासह, उदयनराजे यांनी आरोप केला की, पवारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्यामुळे मराठा समाज आज या परिस्थितीत आहे. उदयनराजे यांनी असेही म्हटले की, “पवार सत्तेत असताना ही आंदोलने होत नव्हती, मात्र पवार विरोधात जाताच ही आंदोलने कशी सुरू होतात? याचा समाजाने देखील विचार करावा.”
तुम्ही प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करत आहात की तयार करण्यासाठी?
सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर बोलताना उदयनराजे यांनी मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत नाराजी व्यक्त केली. “तुम्ही प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करत आहात की तयार करण्यासाठी? आंदोलन हे समाजाच्या भल्यासाठी असते, परंतु इथे राजकीय फायदा साधण्याचे प्रयत्न होत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आणणार
महायुती सरकारच्या कामगिरीवर भाष्य करताना उदयनराजे यांनी सांगितले की, राज्यात अनेक विकासकामे मार्गी लागली असून, आगामी निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळेल. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आपण राज्यभर फिरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी आपल्या बंधु, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारासाठी देखील आपण गावोगावी जाणार असून, त्यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा विश्वास उदयनराजे यांनी व्यक्त केला.