मुंबई : देशामध्ये लोकसभा निवडणूक पार पडली असून त्यानंतर तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेमध्ये आले आहे. यावेळी भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नसला तरी देखील भाजपचे देशामध्ये इतर पक्षांमध्ये अधिक सीट निवडून आले आहेत. यावेळी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. आरोग्य, कुटुंब कल्याण, खते आणि रसायन या खात्यांची जबाबदारी जे. पी. नड्डा यांना देण्यात आली आहे. यानंतर आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी देखील सूचक वक्तव्य केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “विनोद तावडे हे कर्तृत्त्वान व्यक्तीमत्व आहे. जिथे पाठवू तिथे यश कसे मिळेल त्याचे बारकाव्याने ते प्रयत्न करतात. आज मोठा पक्ष चालवण्यामध्ये त्यांची भूमिका आहे. त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं. त्यांच्याबाबतीत अनेक ऑप्शन चर्चेत आहेत. ते काहीही झाले तरी मोठेच होतील. त्यामुळे मला खूप आंनद होईल.” असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. त्यानंतर विनोद तावडे यांच्याबाबतची होणारी चर्चा सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे.
विनोद तावडे होणार का भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष?
भाजपचे सध्या राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे आहेतय जे.पी.नड्डा यांचा कार्यकाळ जानेवारी 2024मध्ये समाप्त झाला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नड्डा यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला. नड्डा यांना मुदतवाढ दिल्यानंतर निवडणूका पार पडल्या. त्यानंतर जे.पी.नड्डा हे केंद्रीय मंत्री होत सत्तेमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे भाजपला लवकर दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संघटनेच्या जबाबदारीसाठी अनेक नावांची चर्चा असताना महाराष्ट्रातील भाजप नेते व सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.