मुंबईच्या तापमानात होतीये घट; मुंबई उपनगरात किमान तापमान 14 अंश सेल्सिअसवर
मुंबई : सध्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. दिवसा कडक ऊन आणि रात्री पाऊस असे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. परतीच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात शेतीवर पाणी फेरले. मात्र, आता हा पाऊस जाण्याच्या मार्गावर असून, ऑक्टोबर अखेरपर्यंत मान्सूनची सांगता होईल अन् राज्यात 1 नोव्हेंबरपासून थंडीची लाट येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवले आहे.
राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण दसरा पावसामध्येच गेला. दिवाळी सण जवळ आला तरी देखील राज्यात पाऊस सुरूच आहे. अशामध्ये सर्वजण थंडी कधी पडणार याची वाट पाहत आहेत. राज्यात थंडी कधी पडणार याबाबत हवामान खात्याने महत्वाची माहिती दिली आहे.
चार दिवसांत दक्षिण नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या 18 जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवमान खात्याने वर्तवली आहे.
आठवड्याभरात ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडीला सुरुवात
हवामानात खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जय बोरानंतर १ नोव्हेंबरनंतर राज्यात थंडी सुरू होणार आहे. सध्या सुरू असलेला पाऊस देखील विश्रांती घेणार आहे. ऑक्टोबर अखेरला मान्सूनची सांगता होणार आहे. येत्या आठवडाभरात नाशिक, जालना, संभाजीनगर, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि अकोला या भागात थंडीला सुरुवात होणार आहे. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी हा अंदाज वर्तवला आहे.
दक्षिण महाराष्ट्रात तुरळक सरींची शक्यता
गुरुवारपासून राज्यात पावसाची उघडीप मिळू शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 26 ते 29 ऑक्टोबरदरम्यान फक्त दक्षिण महाराष्ट्रात चार दिवस तुरळक पावसाची शक्यता आहे.