dombivali theft
डोंबिवली: डोंबिवलीत (Dombivali) एक फिल्मी स्टाईल चोरी झाली आहे. आश्चर्य म्हणजे एका मावस बहिणीने आपल्या बहिणीच्या ४० तोळे दागिन्यांची चोरी (Jewellery Theft) केली आहे. मात्र मानपाडा पोलिसांनी (Manpada Police) फक्त चपलेच्या आधारे चोरी करणाऱ्या महिलेला अटक (Arrest) केली आहे.
प्रिया सक्सेना डोंबिवली येथील खोणी परिसरात राहतात. त्या १२ जानेवारीला नवी मुंबई येथील कामोठे येथे कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्यांच्या घराला कुलूप होते. कार्यक्रमा दरम्यान त्यांनी आपली पर्स पाहिली असता पर्समधून घराची आणि लॉकरची चावी गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या घरी आल्या असता त्यांना घरातील दागिने देखील चोरीस गेल्याचे लक्षात आले.चावीची ही चोरी कार्यक्रमादरम्यान झाली असल्याने संशय कुणावर घ्यावा हे कळत नव्हते. त्यांनी मग मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवली.
[read_also content=”चिन्मय मांडलेकर म्हणतोय ‘आलंय माझ्या राशीला’, कारण माहिती आहे का ? https://www.navarashtra.com/movies/aalay-mazya-rashila-teaser-released-chinmay-mandlekar-seen-in-lead-role-nsr-362088.html”]
मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अविनाश वनवे यांच्या पथकाने तपास सुरू केला. या तपासात संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. याच दरम्यान एक महिला संशयितरित्या वावरताना आढळून आली. पोलिसांनी जेव्हा या महिलेची चप्पल पाहिली तेव्हा ती प्रिया यांची मावस बहीण सिमरन पाटील हीची असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सिमरनला ताब्यात घेत विचारपूस केली असता तिने केलेला गुन्ह्याची कबुली दिली.
मानपाडा पोलिसांनी सिमरनकडून चोरी केलेले चाळीस तोळे सोने हस्तगत केले आहे. सिमरनने आधी पर्समधून चावी चोरली त्यानंतर नवी मुंबई येथून ती खोनी पलावा येथे आली. त्यानंतर प्रिया यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडून तिने दागिने चोरी केले. नंतर पर्समध्ये चावी ठेवायला ती कामोठे येथे कार्यक्रमात देखील पोहोचली मात्र तिला चावी ठेवता आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सिमरन काही दिवसांपूर्वी प्रिया हिच्या घरी राहण्यास आली होती तिने या घराची रेकी केली होती. त्यानंतर तिने दागिने चोरी करण्याचा प्लॅन आखला मात्र तो पूर्ण होऊ शकला नाही. पोलिसांनी फक्त चपलेवरून तिचा गुन्हा उघडकीस आणला.