गडचिरोलीत जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट उभारणार; MIDC कडून 9100 एकर जमीन अधिग्रहण
नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) गडचिरोली जिल्ह्यात जेएसडब्ल्यू ग्रुपच्या जगातील सर्वात मोठ्या स्टील प्लांटची स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी 9100 एकर जमीन अधिग्रहित करण्याची योजना आखत आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील हे आतापर्यंतचे सर्वांत मोठे भूसंपादन असेल.
जेएसडब्ल्यूचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये गडचिरोलीमध्ये एकात्मिक स्टील प्लांटची स्थापना करण्याची घोषणा केली होती. तहसीलजवळील एक जागा निवडण्यात आली होती, परंतु आता चामोशी तहसीलमधील एक पर्यायी जागा प्रस्तावित प्रकल्पासाठी अधिक योग्य म्हणून ओळखली गेली आहे. नवीन जागा खाजगी, वन आणि सरकारी जमिनीचे मिश्रण आहे.
दरम्यान, एमआयडीसीचा असा विश्वास आहे की, खाजगी जमीन अधिग्रहीत करणे सोपे होईल. कारण, स्थानिक लोक सरकारच्या दराने त्यांची जमीन देण्यास तयार असतील. परंतु एमआयडीसीने अद्याप योग्य जागेचा उलगडा केलेला नाही. आता या प्रस्तावाला मान्य करणे हे कंपनीवर अवलंबून आहे.
जेएसडब्ल्यू ग्रुपच्या वतीने जमीन संपादित होणार
कंपनीने सहमती दर्शवल्यानंतर एमआयडीसी जेएसडब्ल्यू ग्रुपच्या वतीने जमीन संपादित करेल. लॉयड्स मेटल्स अॅड एनर्जी लिमिटेडचा चामोशी तालुक्यात आधीच एक एकात्मिक स्टील प्लांट आहे. फेब्रुवारीमध्ये जिंदल यांनी नागपुरात घोषणा केली की, कंपनी दरवर्षी २५ दशलक्ष टन क्षमतेचा प्लांट उभारण्याची योजना आखत आहे. त्यावेळच्या घोषणेनुसार, प्रस्तावित प्रकल्पात एक लाख कोटींची गुंतवणूक असेल, राज्य सरकार या जिल्ह्याला लोखंड आणि पोलाद उद्योगाचे केंद्र म्हणून प्रोत्साहन देत आहे.
हेदेखील वाचा : Navi Mumbai : MIDC परिसरात रस्त्यावर कोळसळा विजेचा खांब; नागरिकांच्या जीवाला धोका, पालिकेचा हलगर्जीपणा
पोलाद क्षेत्रात राज्य पहिल्या क्रमांकावर येणार
महाराष्ट्रात विकसित पोलाद निर्मितीची चोख परिसंस्था पाहता सध्या चौथ्या क्रमांकावर असलेले राज्य पुढील आठ वर्षांत पोलाद निर्मितीत देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी व्यक्त केला होता. यात अधिकाधिक वाटा हा हरित पोलादाचा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.