नवी मुंबई : महापे एमआयडीसी परिसरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच कोंडी झाली होती. मुंबईसह नवी मुंबई आणि उपनगरात रात्रभर झालेल्या पावसामुळे वाहतूक आणि जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच एक मोठी दुर्घटना होता होता वाचली ती म्हणजे नवी मुंबई परिसरात वीजेचा खांब कोळसून पडला आहे.
मुसळधार पावसामुळे महापे येथील MIDC परिसरात सर्व्हिस रोडवर असलेला विजेचा खांब कोसळला. हा विजेचा खांब तसाच पडून असल्याने परिसरातील नागरिकांना विद्युत धक्क्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. MIDC परिसरातील ही घटना अतिशय भितीदायक असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, या दिव्याच्या खांबावर नवी मुंबई महानगरपालिका व नवी मुंबई पोलीस विभागाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. हे कॅमेरे देखील खांबासोबत रस्त्यावर कोसळले असून, अद्याप संबंधित विभागाला याची माहिती नाही, ही बाब अधिकच धक्कादायक आहे.
या घटनेनंतर पश्चिम महाराष्ट्र एकता मंचचे अध्यक्ष योगेश चव्हाण यांनी नवी मुंबई महानगरपालिकेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी मागणी केली आहे की, “नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व विद्युत खांबांचे स्ट्रक्चरल ऑडिट तात्काळ करण्यात यावे आणि जीर्ण खांबांची योग्य दुरुस्ती करून नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा.या प्रकरणाकडे संबंधित प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विजेचा खांब कोसळ्यानंतर पालिकेने यावर ठोस भूमिका घेणं गरजेचं होतं मात्र तसं झालं नाही. पालिकेच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांचा जीव गेला असता तर याला जबाबदार कोण, असा सवाल देखील उपस्थित केला आहे. याबाबत नवी मुंबई महानगर पालिका आता काय ठोस भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.