४७१ गावांमध्ये 'एक गाव, एक गणपती'
यवतमाळ : राज्यात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह ग्रामीण भागातील मंडळांकडून तयारी पूर्ण झाली आहे. त्या अनुषंगाने बाजारपेठेतही गर्दी वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात यावर्षी २४९१ सार्वजनिक मंडळांकडून श्री गणेशाची स्थापना होणार आहे. तसेच ४७१ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना यावर्षीही यथावत राखली गेली आहे.
लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी शहरासह ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी (दि.27) श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी मंडळांसह घरोघरी बाप्पाची प्रतिष्ठापना केली जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांकडून मंडप सजावट जवळपास पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण २४९१ सार्वजनिक गणेश मंडळाकडून गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. तर ४७१ गावांत ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.
पुढील १० दिवस कायदा व सुवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने २ एसआरीपीएफची अतिरिक्त तुकडी मागविण्यात आली.
मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सण
जिल्ह्यात मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. भाविक वर्षभरापासून आतुरतेने गणरायाची वाट पाहतात. आता प्रत्यक्षात लाडक्या गणरायाचे आगमन होत असून, गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. अनेक मंडळांनी प्लास्टिकमुक्त समाज, जलसंवर्धन, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण आणि रक्तदान शिबिरे असे सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखली आहे. ग्रामीण भागात पारंपारिक ढोल-ताशे आणि भजनांच्या गजरात गणेश मूर्तीची स्थापनाही केली जात आहे.
प्रशासनाकडूनही जय्यत तयारी
संभाव्य गर्दी लक्षात घेता, पोलिस प्रशासनाने विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलिस तैनात केले जातील. स्वच्छता अभियानांतर्गत, मंडप परिसरात स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी नगर परिषद आणि ग्रामपंचायतींवर सोपवण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षण लक्षात घेऊन, पर्यावरणपूरक मूर्तीचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.