Zilla Parishad Election 2025
Maharashtra Zilla Parishad Election 2025: गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. तर २७ ऑक्टोबरपर्यंत अंतिम यादी आणि मतदाननिहाय यादी जाहीर केली जाईल. “राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून, त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येईल.”
जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल. या प्रारूप यादीवर १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर २७ ऑक्टोबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादीसह मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात येईल. मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जाणार असल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे, नावे आणि पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे, याद्या आद्ययावत करणे, अशी कामे केली जात नाही. मात्र हरकती आणि सुचनांच्या माध्यमातून फक्त मतदार याद्यांच्या विभाजनावेळी लेखनिकाकडून झालेल्या चुका, मतदाराचा निवडणूक विभाग किंवा गण चुकून बदलला जाऊ शकतो. तसेच, विधानसभेच्या यादीत मतदाराचे नाव असतानाही प्रभागाच्या यादीत नाव नसल्यास त्यासंदर्भात आलेल्या दुरुस्त्या हरकती आणि सूचनांच्या अनुषंगाने बदल केले जातात.
Kalyan Crime: आधी इंस्टवर मैत्री, नंतर ५ महिने ७ जणांकडून सामूहिक अत्याचार; अल्पवयीनचा व्हिडीओ
दरम्यान, गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील मनपा, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदानाची घोषणा केली आहे. तर, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांचीही तयारीही सुरू झाली आहे. आयोगाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन ते तीन टप्प्यात राज्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होऊ शकतात. तर मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे, तर मुंबई महापालिकेची निवडणूक अगदी शेवटच्या तिसऱ्या टप्प्यात होऊ शकते.