
दरम्यान , शनिवार (७ फेब्रुवारी) रोजी मतदान होणार आहे. तर सोमवारी (९ फेब्रुवारी) रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील एकूण ६८ जागांसाठी तब्बल २४१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी ४५५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या निवडणुकांमध्ये बहुतांश ठिकाणी तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढती होत असल्याने मतदारांसमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे. प्रत्येक मत निर्णायक ठरण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात कमालीची ताकद लावली आहे.
या निवडणुकांमध्ये महायुतीमधील घटक पक्ष एकमेकांविरोधातच उभे ठाकल्याचे चित्र दिसून येत आहे. स्थानिक पातळीवरील वर्चस्व, सत्ता आणि राजकीय प्रतिष्ठा यासाठी मित्र पक्षांमधीलच उमेदवार आमनेसामने आले आहेत. त्यामुळे प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोप, शक्तिप्रदर्शन आणि नेत्यांच्या फेऱ्यांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी जिल्ह्यात तळ ठोकला होता. सभा, पदयात्रा, कोपरा बैठका, डोअर टू डोअर भेटी अशा माध्यमांतून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. ग्रामीण भागात पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि रोजगार यांसारख्या मुद्द्यांवर उमेदवारांनी भर दिला, तर काही ठिकाणी स्थानिक विकासकामे आणि वैयक्तिक संपर्क हा प्रचाराचा मुख्य आधार ठरला.
दरम्यान, निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक तयारी केली आहे. शुक्रवारी दि. ६ रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान साहित्य रवाना करण्यात येणार आहे. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, मतदानादिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासन सतर्क आहे. आचारसंहिता काटेकोरपणे पाळली जावी यासाठी भरारी पथके आणि निरीक्षक सक्रिय ठेवण्यात आले आहेत.
Ajit Pawar plane crash Conspiracy:’…तर भविष्यात त्याच्या घरात पाळणा हलवायला सुद्धा कुणी राहणार नाही
पावणेनऊ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, कोणाच्या गळ्यात सत्तेची माळ पडणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. ७ फेब्रुवारी रोजी मतदार आपला कौल देतील, तर ९ फेब्रुवारी रोजी निकालातून जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाची दिशा स्पष्ट होणार आहे. सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून, कोल्हापूरच्या राजकीय भवितव्यावर तिचा मोठा प्रभाव पडणार असल्याचे चित्र आहे.
तालुकानिहाय गट आणि गणसंख्या
तालुका-गट-गण
करवीर- १२-२४
हातकणंगले- ११-२२
शिरोळ- ७-१४
पन्हाळा- ६-१२
कागल- ६-१२
राधानगरी-५-१०
गडहिंग्लज- ५-१०
चंदगड- ४-८
भुदरगड- ४-८
शाहूवाडी- ४-८
आजरा- २-४
गगनबावडा- २-४
एकुण- ६८-१३६
जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार
तालुका- जिल्हा परिषद – पंचायत समिती
शाहूवाडी-१३-१९
पन्हाळा- २७-४०
हातकणंगले-८१-७४
शिरोळ- २४-४२
करवीर- ४५-८१
गगनबावडा-५-८
राधानगरी-२३-४६
कागल- १६-३९
भुदरगड-१०-२३
आजरा- ८-१८
गडहिंग्लज-२०-३९
चंदगड- ९-२६
एकुण- २४१-४५५