'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याचं आईला लिहिलं भावुक पत्र, पोस्ट चर्चेत
सध्या सोशल मीडियासह सर्वत्र मायरा वायकुळच्या ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटाची जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. अगदी सामान्यांपासून ते मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींपर्यंत सर्वच मंडळी आपल्या मनातील भावना देवासमोर पत्राद्वारे व्यक्त करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पूजा सावंत हिने पत्राद्वारे देवासमोर आपल्या मनातल्या भावना मांडल्या होत्या. आता अशातच ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेते मिलिंद गवळी यांनीही यानिमित्त आपल्या आईला खास पत्र लिहिलंय.
बांग्लादेशात ‘पुष्पा २’ नंतर कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’वरही बंदी, नेमकं कारण काय ?
पत्रामध्ये देवाच्या समोर आपल्या मनातल्या भावना मांडताना मिलिंद गवळी लिहितात की, ” ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर…’ ज्या माणसांमध्ये इनोसेन्स असतो त्या माणसाला देव लवकर पावतो. जी माणसं हुशार असतात किंवा अती हुशार असतात, त्यांच्या डोक्यामध्ये असंख्य प्रश्न असतात, देव आहे की नाही आहे. कधी कधी मला असं वाटतं की अशा अति हुशार लोकांच्या समोर प्रत्यक्ष देव जरी आला तरी त्याला प्रश्न विचारून विचारून ते देवालाच भंजाळून सोडतील. मी माझ्या आजीची आणि माझ्या आईची निरागस निष्पाप देव भक्ती पाहिली आहे, त्या दोघींना काही हवं असेल तर ते कोणाकडेही मागत नसे, एखादा मंदिरात जाऊन त्या मूर्ती समोर एक नवस बोलत असे, मग देवाला सांगितलेलं काम पूर्ण झालं किंवा ती वस्तू त्यांना मिळाली, की मग नवस फेडायला जायचं आहे.”
“या गोष्टीचा हट्ट करायच्या, महिना दोन महिने सतत नवस फेडायला जायचं आहे हा विषय काढायच्याच, मग काय मी पण जायचो त्यांच्याबरोबर त्यांनी बोललेला नवस फेडायला, मग ते शिर्डी असो शेगाव असो अक्कलकोट असो गाणगापूर असो कोल्हापूरची अंबाबाई असो किंवा तुळजापूरची महालक्ष्मी असो, पंढरपूरचा विठ्ठल असू दे. त्यांच्याबरोबर माझं सुद्धा महाराष्ट्रातल्या असंख्य देवस्थानांचं दर्शन घडायचं, माझी सहल किंवा पिकनिक सोमेश्वर, त्रंबकेश्वर, सज्जनगड, अष्टविनायक, मुंबईतलं सिद्धिविनायक, महालक्ष्मी, गणेशपुरीच्या नित्यानंद बाबांचे मंदिर इथेच असायची, देवीला खूप आधीच साडी, खण, घेऊन ठेवलेली असायची, मग पुजाऱ्याला थोडं पैशाचा आमिश देऊन देवीला ती नेसवली जायची. आणि माझ्या आईचे 90-95% नवस तर माझ्यासाठीच असायचे.”
“आणि आज मी जेव्हा मागे वळून बघतो, तेव्हा जे काही माझ्या आयुष्यात घडून गेलंय किंवा जे काही घडतंय, हे त्या परमेश्वरी शक्ती शिवाय अशक्यच होतं. काल असंच मला निष्पाप निरागस व्हायची संधी मिळाली, सुबोध बारे यांचा फोन आला आणि “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या आगामी मराठी चित्रपटातल्या मायरा सारखं ‘देवाच्या घरी’ पत्र पाठवायची संधी मिळाली, मग काय मी लगेच माझ्या आईला पत्र लिहिलं. “मुक्काम पोस्ट देवाचं घर”नावाचा गोड निरागस चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कथा दिग्दर्शक संकेत माने, निरागस मायरा, मंगेश देसाई, सविता मालपेकर, प्रथमेश परब असे अनेक गोड कलावंत या चित्रपटात आहेत. आता परत एकदा आपल्या सगळ्यांना इनोसेंट होण्याची गरज आहे, या इंटरनेटच्या राक्षसामुळे आपण सगळेच “अति” हुशार, अति शहाणे झालो आहोत, OTT वरचा रक्तपात, विभत्स, अश्लील बघून झालं असेल, तर आता “मुक्काम पोस्ट देवाचं घर” बघूया का ?”