प्रसाद ओकला लेकाकडून खास गिफ्ट, मंजिरी ओकने दिल्या जुन्या आठवणींना दिला उजाळा
प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. कायमच सिनेमांमुळे चर्चेत राहणारा प्रसाद सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेता प्रसाद ओकला त्याच्या मुलाने स्पेशल सरप्राईज गिफ्ट दिलं आहे. कारण ठरलं त्याचा वाढदिवस. प्रसाद ओकच्या लेकानेच म्हणजेच सार्थक ओकने अभिनेत्याला खास अलिशान कार गिफ्ट म्हणून दिली आहे. खास पोस्ट शेअर करत मंजिरी ओकने लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अभिनेत्याचे अभिनंदन केले आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये मंजिरी ओकने लिहिले की, “सार्थक जेव्हा गोष्ट तुमच्या बाबतीतली यायची… तेव्हा आपला बाबा (प्रसाद ओक) तसा थोडा भित्राच होता (अजूनही आहे). तुझ्या दुसऱ्या वाढदिवसाला (म्हणजे ३ सप्टेंबर २००२) जरा मी मागे लागले म्हणून बाबाची तयारी नसताना त्याने तुला ही सायकल सरप्राईज गिफ्ट म्हणून आणली होती. पण त्याला काळजी की तू ती चालवताना पडलास तर? तुला लागलं तर? म्हणून कित्येक दिवस त्याने तुला ती सायकल घराखाली नेऊ पण दिली नाही. (अर्थात आपण हळूच जायचो तो नसताना) त्यावर बसायचं कसं हे पण तुला कळत नव्हतं. मात्र तू बाबाला ती पहिल्यांदा चालवून दाखवल्या नंतरचा जो आनंद तुझ्या चेहऱ्यावर होता अगदी तोच आणि तसाच आनंद (लहान मुलासारखा) आज बाबाच्या चेहऱ्यावर आहे..”
पोस्टमध्ये मंजिरीने पुढे लिहिलंय की, “आज २२ वर्षांनी (३ सप्टेंबर २०२४) तू बाबाला ही मोठ्ठी गाडी सरप्राईज गिफ्ट दिलीस… मी नको म्हणाले तर तू म्हणालास की, बाबा स्वतःहून कधीच स्वतःसाठी मोठी गाडी घेणार नाही. (त्या ऐवजी छोटं घर घेऊ असंच म्हणेल ) माझ्याकडे शब्द नाहीयेत सार्थक… फक्त एवढच सांगते की खूप खूप अभिमान वाटतो तुझा आणि मयंकचा पण…!!! खूप मोठ्ठा हो, स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा “B”est “M”any “W”ishes”
प्रसाद ओकला त्याच्या लेकाने BMW कार गिफ्ट केली आहे. मंजिरीने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात असून सार्थकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अमृता खानविलकर, पृथ्विक प्रताप, अमेय वाघ, क्रांती रेडकर, सुबोध भावे, शशांक केतकर, अभिजित खांडकेकर, सोनाली नाईक, आदिनाथ कोठारे, सचिन गोस्वामी, हर्षवर्धन वावरे, समीर चौघुले सहित अनेक सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.