sunita ahuja in mahakal temple
बॉलीवूडचा अभिनेता गोविंदा (Govinda) प्रमाणेच त्याची पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) ही कायम चर्चेत असते. सुनीता अभिनयापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर ती वेगवगेळ्या कारणांमुळे चर्चेत असते. गोविंदाची पत्नी सुनीता पुन्हा एकदा वादात आली आहे. सुनीता आहुजाने नुकतंच महाकाल मंदिरात (Sunita Ahuja At Mahakal Temple) दर्शन घेतलं. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी ती गेली होती. या महाकाल मंदिरातील सुनीता आहुजाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.(Sunita Ahuja Trolled)
या फोटोंमध्ये सुनीताने गुलाबी रंगाची साडी घातली होती. तिने कपाळावर मोठी बिंदी आणि कुंकू लावलं आहे. त्याचवेळी तिच्या खांद्यावर हाताची पिशवी असल्याने गोंधळ उडाला. यावेळी सुनीता आहुजा ही एकटी दिसली. सुनीता आहुजा यांच्यावर मंदिरात जाताना नियम मोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. ती महाकालेश्वराच्या गाभाऱ्यात पर्स घेऊन गेली होती. मंदिर परिसराच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ती सोशल मीडियावरील यूजर्सच्या निशाण्यावर आली. नेटकऱ्यांनी तिला खुप ट्रोल केलं आहे. सुनीताला बॅग घेऊन आत जाऊ कसं दिलं? मंदिर समितीच्या कोणत्याही माणसाने तिला अडवले का नाही? असे अनेक प्रश्न नेटकरी विचारत आहे. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये सुनीता आहुजासोबत मंदिराचे पंडितही दिसत आहेत.
या घटनेनंतर मंदिराच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण कोणीही बॅगमध्ये काहीही घेऊन मंदिरात प्रवेश करू शकतं. हे प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचल्याने आता चांगलाच गदारोळ झाल्याचं समोर आलं आहे. देवाच्या मंदिरातही व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याने युजर्सनी सुनीताला चांगलंच खडसावलं. सध्या हे प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलं आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई केली जाणार आहे. कोणी चूक केली असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचं मंदिराचे प्रशासक संदीप सोनी यांनी सांगितलं आहे.