"बोलताना मात्र विनाकारण शिव्या आईवरून..." संकर्षण कऱ्हाडेची आईसाठी खास कविता
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, कवी आणि उत्तम सूत्रसंचालक म्हणून लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade). आपल्या कलागुणांमुळे संकर्षण अल्पावधीत लोकप्रिय झाला. नाटक, मालिका अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा संकर्षण सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. संकर्षण सध्या ‘ड्रामा ज्युनियर्स’ या रिॲलिटी शोच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. या शोमध्ये नवरात्री स्पेशल एपिसोडमध्ये अभिनेत्याने आईसाठी एक छानशी कविता सादर केली आहे.
‘ड्रामा ज्युनियर्स’ च्या मंचावरून संकर्षनने कविता सादर केली होती. अभिनेत्याचीही कविता झी मराठीच्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आली आहे. अभिनेत्याने आईवर सादर केलेली ही कविता ऐकून तुमच्याही नक्कीच डोळ्यात पाणी येईल.
संकर्षणने सादर केलेली कविता
आज म्हटलं स्वत:ला जरा जाब विचारावा
आईसाठी आपण काय करतो ? आढावा घ्यावा…
आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय ?
आपण जेवायच्या आधी केव्हा आईचं ताट आपण कधी वाढलंय ?
बरं तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता?
बरं तुम्हीच सांगा तुमच्या आईचा फेव्हरेट कलर कोणता ?
देवा आईला हवं ते मिळो, अशी कधी प्रार्थना केलीये ?
पाहिलंय का आई शेवटची कधी ऑनलाईन आलीये ?
तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून आपण कधी देतो ?
तिने घरात केलेला पसारा आपण केव्हा आवरतो?
तरीही बाळाला कोण काही बोललं की तिचं मन येतं भरून
आपण मात्र बोलताना विनाकारण शिव्या आईवरून
अहो लक्षात ठेऊन बाळासाठी ती सतत हात पसरते
कधी दैवापुढे, कधी देवापुढे तर कधी नशीबापुढे,
लक्षात ठेऊन बाळासाठी ती सतत हात पसरते
फक्त स्वत:ची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते
आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागाना, आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागाना…
तिचा खडबडा हात हातात घेऊन एकदा बघाना…
कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते
आईनी कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते
उगाच कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता
आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे म्हणता ?
आईला सतत मुलांचा ध्यास आणि त्यांच्याच प्रेमाची धुंदी
बाळाने कधीच गंमत आणली नाही तरीही आई सतत आनंदी
नको कुणाशी स्पर्धा देवा, नको कोणाचा हेवा
जग जिंकायचं असेल ना मित्रांनो आईच्या पायावर डोकं ठेवा