फोटो सौजन्य - सोशल मीडिया
Hashtag Tadev Lagnam Poster : शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा सिनेमा येत्या २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. आजच्या काळातील ‘हॅशटॅग’ ही संकल्पना आणि लग्न यावर आधारित हा चित्रपट आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन, लेखन आनंद दिलीप गोखले यांनी केले असून या चित्रपटाचे निर्माते शेखर विठ्ठल मते आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान एकत्र येत आहेत.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये लग्नाच्या वेषात घोड्यावर मुंडावळ्या बांधलेला नवरदेव दिसत आहे तर त्याच्यामागे ऑफिसच्या पेहरावात बसलेली नवरी दिसत आहे. त्यामुळे नक्की हा काय प्रकार आहे, असा प्रश्न पोस्टर पाहून प्रथमदर्शनी डोक्यात येतोय.
यात लग्नकार्यातील धमाल तर आहेच. याशिवाय आजच्या काळातील लग्न, पिढीचे विचारही दिसणार आहेत तसेच दोघांच्या प्रवासाची पार्श्वभूमीही वेगळी असल्याने चित्रपटाची कथा प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल, असे म्हणायला हरकत नाही.
हे देखील वाचा – बाप्पाच्या विसर्जनानंतर भक्तांच्या मनातील गाणं “बाप्पा माझ्या तू” झाले लाँच!
चित्रपटाबाबत दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, “आयुष्याच्या वाटेवर लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. आत्ताची पिढी लग्न हा विषय आणि नातेसंबंधांवर काय भाष्य करते, यावर आधारित असणारा हा चित्रपट सर्वांनाच आपलासा वाटेल, असा आहे. त्यामुळे या चित्रपटातील वेगळेपणा बघण्यासाठी प्रेक्षकांना २० डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.”